गर्दीच्या चौकातच वाहनांचे पार्किंग ; पोलीस प्रशासनाची बघ्याची भूमिका
निपाणी (वार्ता) : शहरातील मुख्य असणाऱ्या धर्मवीर संभाजीराजे चौकात अनेक चारचाकी वाहनधारक थेट गाड्या पार्किंग करत आहेत. वारंवार वाहतूक कोंडी होणाऱ्या या चौकात आता वाहनांच्या पार्किंगमुळे कोंडीत भरच पडली आहे. अशावेळी याठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी उभे असणारे पोलीस तसेच होमगार्ड मात्र बघ्याची भूमिका बजावताना दिसत आहेत. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
शहरात प्रवाशांसह वाहनधारकांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशातच निपाणी-मुधोळ या महामार्गामुळे अवजड वाहनांची वाहतूकही शहरातून होत आहे. त्यामुळे धर्मवीर संभाजीराजे चौकात दररोज वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. सहा-सात वर्षांपूर्वी येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात वाहतूक कोंडी रोखण्यासाठी ट्राफिक सिग्नल बसविण्यात आला. मात्र केवळ महिनाभरच हा सिग्नल सुरू राहिला. त्यानंतर आजतागायत सिग्नल बंदच राहिल्यामुळे ही सिग्नल व्यवस्था पुरती कोलमडली आहे. काही स्थानिक व्यापाऱ्यांच्या दबावाला बळी पडून हा सिग्नल बंद करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
अशातच गेल्या काही दिवसांपासून बसस्थानकाला लागूनच असलेल्या रिक्षा स्टॉपनजिकच्या जागेत चारचाकी वाहने बिनधास्त लावली जात आहेत. बसस्थानकात पार्किंग व्यवस्था असताना तेथे पैसे देण्यापेक्षा बाहेर रस्त्यावर वाहन लावलेले बरे अशा भावनेतून अनेक जण चौकाच्या ठिकाणी पार्किंग करताना दिसत आहेत. त्यामुळे बेशिस्त वाहतूक व अपघाताला निमंत्रण मिळत आहे. अशावेळी या चौकातच असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहतूक शिस्त मोडणाऱ्या दुचाकीधारकांना दंड आकारला जात आहे. मात्र भर रस्त्यातच वाहने पार्किंग करणाऱ्या या चार चाकी वाहनधारकांवर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. हा दुजाभाव रोखून पोलीस प्रशासनाने शिस्त मोडणाऱ्या प्रत्येक वाहनधारकावर कारवाई करावी तसेच शहरातील वाहतूक कोंडी होणाऱ्या प्रमुख ठिकाणी कोंडी रोखण्यासाठी तात्काळ कठोर पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta