बेनाडी, जत्रांटमध्येही वीज बंद : दिवसभर दुरुस्तीची कामे
निपाणी (वार्ता) : हेस्कॉमकडून शनिवारी (ता.९) दिवसभर येथील चिक्कोडी रोडवरील विद्युत केंद्र आणि बेनाडी, जत्राट येथील विद्युत केंद्रामध्ये दुरुस्तीचे काम चालणार आहे. त्यामुळे दिवसभर वीजपुरवठा खंडित होणार आहे. शहराला पाणी पुरवणाऱ्या जवाहर तलावावर आणि यमगर्णी जॅकवेल परिसरातही वीज खंडित केली जाणार असल्याने शनिवारी श्रीनगर, आंदोलननगरसह शहरातील काही भागात पाणी पुरवठा दिवसभरासाठी खंडित करण्यात येणार आहे. शहरवासीयांनी तत्पूर्वी पाण्याची व्यवस्था करून सहकार्य करण्याचे आवाहन नगरपालिकेने केले आहे.
शनिवारी निपाणी येथील समाधीमठ, जत्राट आणि बेनाडी या तीन विद्युत उपकेंद्रातील वीजपुरवठा हेस्कॉमकडून सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत खंडीत केला जाणार आहे. या काळात यमगर्णी येथील वेदगंगा नदीतून जवाहर तलावात होणारा पाण्याचा उपसा थांबणार आहे. शिवाय जवाहर तलाव आवारातही वीजपुरवठा खंडित होणार असल्याने तलावातून शहर आणि उपनगराला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने शहरवासियांची गैरसोय होणार आहे.
सकाळी ९ वाजेपर्यंत शहरात वेळापत्रकानुसार पाणी पुरवठा सुरळीत राहणार आहे.
शनिवारी दिवसभर वीजपुरवठा खंडीत होणार असल्याने यमगर्णी वेदगंगेतून जवाहर तलावात होणारा उपसा बंद राहणार आहे. त्यामुळे शहरातील काही भागात पाणीपुरवठा करणे अशक्य आहे. नागरिकांनी एक दिवस सहकार्य करण्याचे आवाहन नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी आणि सुपरवायझर प्रवीण कणगले यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta