अभ्यासक बाबासाहेब मगदूम यांची माहिती
निपाणी (वार्ता) : आडी (ता. निपाणी) येथील श्री. मल्लया डोंगरावरील प्राचीनशिवलिंगावर बुधवारपासून (ता.१३) सूर्योदयानंतर काही वेळातच किरणोत्सवास प्रारंभ होणार आहे. हा वेदांत आणि विज्ञानाची सांगड घालणारा किरणोत्सव सोहळा गुरुवारपर्यंत (ता.२१) चालणार आहे. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन किरणोत्सवाचे अभ्यासक बाबासाहेब मगदूम यांनी केले आहे.
दक्षिणायणातील परतीच्या या किरणोत्सवाची सुरुवात बुधवारी (ता.१३ ) सूर्योदयानंतर दहा पंधरा मिनिटातच मुख्य शिवलिंगावरून होणार आहे. यावेळी केवळ पाच मिनिटे सूर्यकिरण शिवलिंगावर राहणार आहेत. हे सूर्यकिरण गुरुवारी (ता.१४) व शुक्रवारी (ता.१५) प्रामुख्याने मुख्य शिवलिंगाचा साठ ते सत्तर टक्के भाग व्यापणार आहेत. शनिवारी (ता. १६) काही प्रमाणात किरण मुख्य शिवलिंगावर राहतील. तर रविवारी (ता.१७) व सोमवारी (ता.१८) मुख्य शिवलिंगाच्या शाळुंखीवर राहतील. त्यानंतर १९, २० व २१ रोजी हे सूर्यकिरण शक्ती शिवलिंगावर राहणार आहेत. शुक्रवारनंतर (ता.२२) हे किरण दोन दिवस गाभाऱ्यात राहून बाहेर पडतील. या किरणांचा गाभाऱ्यातील प्रवास दक्षिणेकडून उत्तरेकडे होताना दिसेल. एकंदर हा किरणोत्सव सुरुवातीस पाच सहा मिनिटापासून १३,१४ मिनिटे पर्यंत वाढत जातो. पुन्हा कमी कमी होत जाणार असल्याचे मगदूम यांनी सांगितले. किरणोत्सव संशोधनासाठी जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्रा. डॉ. आर. व्ही. भोसले व डॉ. शिवराम भोजे यांचे मार्गदर्शन लाभले. तर छाया चित्रकार किसन लोखंडे यांचे सहकार्य लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta