आमदार शशिकला जोल्ले; आरक्षणामुळे निपाणीत आनंदोत्सव
निपाणी (वार्ता) : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा व विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण जाहीर करून महिला सबलीकरणाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे. विश्वगुरू महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकात सर्वप्रथम समाजात समानता आणण्याचा प्रयत्न केला. आता त्यांच्याच रूपात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला आरक्षणाची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे महिलांना पुढील काळात विविध क्षेत्रांमध्ये अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचे मत आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले.
महिलांना राजकारणामध्ये ३३ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी केल्याने येथील कित्तूर चन्नमा चौकात महिला व भाजप कार्यकर्त्यां तर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.त्याप्रसंगी आमदार जोल्ले बोलत होत्या.
आमदार शशिकला जोल्ले यांच्या हस्ते कित्तूर चन्नमा यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला. शहर भाजप महिला मोर्चा अध्यक्षा विभावरी खांडके यांनी स्वागत केले.
आमदार जोल्ले म्हणाल्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाव्दा सर्वांना समान हक्क दिले आहेत. अलीकडच्या काळात महिला सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत. देशाला स्वातंत्र्यानंतर राजकीय क्षेत्रातही आरक्षण मिळवून देण्याने ऐतिहासिक काम पंतप्रधानांनी केले आहे. यापूर्वी लोकसभेमध्ये केवळ ८० महिला कार्यरत होत्या. या आरक्षणामुळे आता ही संख्या १८० वर जाणार असल्याचे जोल्ले यांनी सांगितले.
यावेळी कित्तूर चन्नम्मा चौकापासून धर्मवीर संभाजी महाराज चौकापर्यंत पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष जयवंत भाटले, हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष एम. पी. पाटील, उपाध्यक्ष पवन पाटील, संचालक राजू गुंदेशा, समीत सासणे, प्रकाश शिंदे, कावेरी मिरजे, नीता बागडे, गीता पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुनिल पाटील, भाजप शहराध्यक्ष प्रणव मानवी, विजय टवळे, दत्ता जोत्रे, सोनाली उपाध्ये, सुजाता कदम, अशा टवळे, यांच्यासह नगरसेवक, भाजप कार्यकर्ते, महिला उपस्थित होते.