निवृत्त कर्नल शिवाजी बाबर : निपाणीत लेफ्टनंट रोहित कामत यांचा नागरी सत्कार
निपाणी (वार्ता) : नेतृत्व करण्याची ताकद फार मोठी आहे. युवावर्गाची विविध क्षेत्रातील भरारी पाहता अभिमानाने छाती फुलते. देशसेवेत निपाणी तालुक्यातील अनेक जवानांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. युवावर्गाने आपल्या नेतृत्वातून देशाचा अभिमान वाढविण्याचे ध्येय उराशी बाळगणे गरजेचे आहे, जिद्द व चिकाटीच्या जोरावर विविध क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन घेण्यासाठी आपला वेळ व पैसा खर्च करावा, असे प्रतिपादन निवृत्त कर्नल शिवाजी बाबर यांनी केले.
ते येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात लेफ्टनंट रोहित कामत यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रीय सेवानिवृत्त को. ओर्डीनिशन समिती कर्नाटक राज्यचेमाजी अध्यक्ष बी. एम. संगरोळे, निवृत्त जेसीओ बाळासाहेब पसारे यांची उपस्थिती होती.
रमेश देसाई यांनी स्वागत केले. अशोक राऊत यांनी केले. बाबर म्हणाले, देशाची सेवा करणारा प्रत्येक जवान हा एक अनमोल पदक आहे. नेतृत्वाच्या जोरावरकोणतीही गोष्ट अशक्य नाही. ती सिद्ध करण्यासाठी आपल्यातील जवानाला युवकांनी जागे करण्याची गरज आहे.
माजी आमदार काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, प्रा. डॉ. अच्युत माने यांनी आपल्या मनोगतात, कामत कुटुंबीयांच्या समर्थसाथीमुळे रोहितने कमी वयात यशाला गवसणी घातली आहे. अशक्य वाटणार्या विविध गोष्टींना शक्य करण्याची उर्मी जो बाळगतो, तोच यशाचे शिखर पादाक्रांत करु शकतो. निपाणीच्या इतिहासात हे पद प्राप्त करुन रोहित कामत यांनी मानाचा तुरा रोवला असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना लेफ्टनंट रोहित कामत यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास नगराध्यक्ष जयवंत भाटले, प्रणव मानवी, रोहन साळवे, राजेश कदम, गजानन शिंदे, उस्मानगणी पटेल, कांचन बिरनाळे, अरुण खडके, नजीर नालबंद, सचिन पोवार यांच्यासह साखरवाडीतील विविध मंडळांचे कार्यकर्ते, मान्यवर, उद्योजक, नागरिक उपस्थित होते. ज्योती कामत-चव्हाण यांनी आभार मानले.
