
धन्यकुमार शेटे : कुर्ली हायस्कूलमध्ये अटल विज्ञान प्रदर्शन
निपाणी (वार्ता) : शालेय विद्यार्थी व युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याच्या उद्देश्याने निती आयोगाने अटल इनोव्हेशन मिशनच्या अंतर्गत अटल टिंकरिंग लॅब हा प्रयोग देशभरात सुरू केला आहे. नव्या तंत्रज्ञानाची ओळख होवून समाज उपयोगी साधने निर्माण करण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविले जात आहे. यामुळे कौशल्याधारीत शिक्षणाला चालना मिळत असल्याचे मत रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी धन्यकुमार शेटे यांनी व्यक्त केले. कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात अटल टिंकरिंग लॅब उपकरण प्रदर्शन कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक एस. एस. चौगुले होते.
ए. ए. चौगुले यांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या अटल टिंकरिंग इंनोवशन प्रदर्शन अंतर्गत विविध उपकरणांची माहिती दिली. लॅब मधील साहित्यापासून विद्यार्थ्यांनी स्वयंचलित सोलार ट्रॅकर, इनोव्हेशनल डस्ट बिन, ट्रॅक फॉलोअर रोबोट, स्वयंचलित रेल्वे इंफॉर्मर, केमिकल पोलुशन कंट्रोलर, इनोव्हेंटिव्ह टेरकेस सिस्टीम, थ्री डी प्रिंटिंग अशा नाविन्यपूर्ण उपकरणांची निर्मिती केली. सदर उपकरणे ही समाज उपयोगी असून दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग होणे गरजेचे असल्याचे धन्यकुमार शेटे यांनी सांगितले. तसेच विद्यालयातील विविध उपक्रमांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली.
याप्रसंगी एस. एस. साळवी, के. ए. नाईक, एस. के. कोष्टी, यु. पी. पाटील, विजय साळुंखे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. एस. ए. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ए. ए. चौगुले यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta