कोगनोळी (वार्ता) : बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. याचे पडसाद बेळगाव जिल्ह्यात व कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्भवले. बेळगाव जिल्ह्यात निषेध मोर्चे व बंद पाळण्यात आला. त्याचप्रमाणे सीमेलगत असणार्या कोल्हापुरातही बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला. या सर्व पार्श्वभूमीवर कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्या वाहनांच्यावर कडक नजर ठेवण्यात आली आहे.
बेळगावमध्ये निघालेल्या निषेध मोर्चाला व बंदला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील नेते जातील या उद्देशाने सीमा तपासणी नाक्यावर नेत्यांना कर्नाटक प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
याआधी महाराष्ट्रातील नेते मंडळी कर्नाटकात असणार्या कोगनोळी टोल नाक्यावर येऊन कर्नाटक सरकारचा निषेध करत असल्याच्या उद्देशाने या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्या चार चाकी वाहनांची कसून चौकशी करून या वाहनांमध्ये मोर्चासाठी जाणार्या नेतेमंडळींना परत महाराष्ट्रात पाठविण्यात येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्त कडक करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
या ठिकाणी निपाणी मंडळ पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, कोगनोळी पोलीस स्टेशनचे एएसआय एस. ए. टोलगी, एएसआय एस. आय. कंभार, पोलीस राजू गोरखनावर यांच्यासह पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
