निपाणी (वार्ता) : नवरात्र उत्सवानिमित्त येथील मध्यवर्ती शिवाजी चौक तरुण मंडळतर्फे घटस्थापनेपासून शहरातील विविध भागात दुर्गामाता दौड काढली जात आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून सलग दहाव्या दिवशी धारकरी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह कायम आहे. या दौडीतून निपाणी शहर आणि परिसरात देशभक्तीचा जागर दिसून येत आहे. मंगळवारी दौडीचा शेवटचा दिवस असून मान्यवरांच्या उपस्थितीत या सोहळ्याची सांगता होणार आहे.
सोमवारी (ता.२३) पहाटे मध्यवर्ती शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज मूर्तिचे पूजन रुपेश माने व ध्वज आणि शस्त्र पूजन महेंद्र खोत यांच्या हस्ते करून ध्येय मंत्राने श्री दुर्गामाता दौडला सुरवात करण्यात आली. तिथून श्री दुर्गामाता दौड निपाणकर राजवाड्याकडे मार्गस्थ झाली. निपाणकर राजवाड्यातील आदिशक्ती जगदंबेची आरती मुगळे गल्लीमधील युवती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करून श्री दुर्गामाता दौड रावण गल्ली कडे मार्गस्थ झाली. श्री दुर्गामाता दौड पाटणकर गल्ली, नागोबा गल्ली, कोकरे गल्ली, मानवी गल्ली, बड्डे गल्ली, निराळे गल्ली, किणेकर गल्ली, मगदूम गल्ली, महात गल्ली, घट्टे गल्ली, भाट गल्ली या परिसरात आल्यावर तेथील नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून श्री दुर्गामाता दौडचे स्वागत केले. यावेळी परिसर शिव जयघोषणे दुमदूमला होता. तिथून श्री दुर्गामाता दौड छत्रपती शिवाजी महाराज चौककडे मार्गस्थ झाली. प्रेरणा मंत्राने श्री दुर्गामाता दौडची सांगता करण्यात आली.
यावेळी वैभव पाटील, कुणाल सुतार, शुभम सुतार, वेंकटेश कोरगावकर, राहुल दळवी, केदार कुंभार, महेश खोत, मनोज शिंदे, दीपक पाटील, मयूर सुतार, दत्तात्रय रावळ, आशिष भाट, अक्षय भाट, चेतन सांडुगडे यांच्यासह मध्यवर्ती श्री शिवाजी तरुण मंडळाचे कार्यकर्ते व शिव प्रेमी उपस्थित होते.