
२४ तास ऑन ड्युटी ; खंडेनवमीला झाले वाहनांचे पूजन
निपाणी (वार्ता) : ‘दसरा असो की दिवाळी, सण असो अथवा उत्सव, आमची २४ तास ड्युटी चाललेलीच असते. आगीच्या घटना घडताच घरातील सुख-दुःखाचे प्रसंग असतानाही सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी आम्हाला जावेच लागते. अग्निशामक गाडीवरच आमच्या संसाराचा गाडा चालतो. अग्निशामक बंब आणि त्याचे साहित्य हेच आमचे दैवत आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर साजरा होणाऱ्या खंडेनवमीदिवशी त्याची सजावट करून मनोभावे पूजा केली जाते.वर्षभर आम्हाला चांगल्याप्रकारे साथ मिळावी, अशी प्रार्थनाही केली’, असे उदगार अग्निशामक दलाच्या जवानांनी काढले.
अक्कोळ क्रॉसवरील अग्निशामक केंद्रात खंडेनवमीनिमित्त सोमवारी (ता. २३) सकाळी ७ वाजल्यापासूनच लगबग सुरू होती. अग्निशामक बंबाच्या स्वच्छतेसह हार अर्पण करण्यात आले. आग विझविण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची पूजाही झाली. सकाळच्या सत्रातच आपल्या गणवेशासह तयार होऊन पूजेची तयारी कर्मचाऱ्यांकडून सुरू होती. प्रत्येकांच्या चेहऱ्यावर वेगळ्या प्रकारचे भाव होते. सर्व साहित्य एकत्रितरित्या मांडून त्यांना फुलाचे हार घालण्यात आले. विधीवत पूजा करून नैवेद्य दाखविण्यात आला.
यावेळी एल. बी. बजंत्री, ए. डी. मुल्ला, निंगाप्पा कमते, यू. एम. पट्टन, बसवराज दोनवाडे, विजय निर्मळे, पी. ए. कुंभार, डी. एल. कोरे, एन. ए. अत्तार, सी. एच. कम्मार, यू. एम. मठपती, के. एम. कुरी, पी. ए. कुंभार, एस.एस. कट्टी, आर. एम. हेगडे, एस.बी. मगदूम, व्ही. बी. नाईक यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
——————————————————————–
१ कोटीची मालमत्ता वाचविली
वर्षभरात आगीच्या २७ घटना शहर व ग्रामीण भागात घडल्या आहेत. त्यामध्ये १९ लाख १२ हजार रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. तर १ कोटीची मालमत्ता अग्निशामक दलाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आगीपासून वाचविली.
——————————————————————–
‘सण-समारंभात कुटुंब व नाते वाईकांच्या सुख-दुःखाचा विचार मनात येत नाही. केवळ आगीच्या आपत्तीतून वाचविण्याचे एकमेव ध्येय डोळ्यासमोर असते. खंडेनवमीला अग्निशामक वाहन व साहित्य दैवत असल्याने आयुध म्हणून पूजा केली.’
-ए. आय. रुद्रगौडर,
निरीक्षक, अग्निशामक दल, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta