मंडळ पोलीस निरीक्षक तळवार; निपाणी शांतता बैठक
निपाणी (वार्ता) : कर्नाटक महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत पिराने पीर दस्तगीर साहेब यांचा ऊरुस गुरुवारपासून (ता.२६) सुरू होत आहे. हा ऊरूस उत्सव शांतता आणि सौहार्दाच्या वातावरणात पार पाडण्याचे आवाहन मंडळ पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांनी केले. उरुसाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते.
शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका
उमादेवी गौडा यांनी, निपाणीतील हिंदु-मुस्लिम ऐक्याची परंपरा लाभलेल्या संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित हजरत दस्तगीर साहेब यांच्या ऊरूसाकरीता मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. या दरम्यान गर्दी नियंत्रणासाठी आणि भाविकांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबध्द आहे. भाविकांनीही आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. दुकानदारांनी सर्व नियमांचे पालन करावे. या काळात कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचे सांगीतले.
यावेळी ऊरूस उत्सव कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई- सरकार यांनी ऊरूस उत्सव कमिटीला पोलीस प्रशासनाचे सहकार्य अत्यंत महत्वाचे आहे. त्यांच्या बरोबरीने उरूस उत्सव कमिटी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी कार्यरत राहील, असे सांगितले.
बैठकीस राजूबाबा सरकार, पृथ्वीराज चव्हाण, शरदचंद्र मळगे, पालीका आयुक्त जगदिश हुलगेज्जी, जयराम मिरजकर, बंडा घोरपडे, प्रभाकर पाटील, रणजीतसिंह देसाई-सरकार, सुजयसिंह गायकवाड यांच्यासह उरूस उत्सव कमिटी सदस्य उपस्थित होते.