गटशिक्षणाधिकारी नाईक; तालुकास्तरीय चेतना कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : पूर्वीच्या काळातील स्मारके म्हणजे केवळ इमारती नव्हत्या. कथा, कला आणि ज्ञानाचे भांडार या स्मारकाकडे आहेत. त्यामधून साहस, सभ्यता, सांस्कृतिक, धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय कामगिरीचे प्रतिनिधित्व दिसून येते. त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व मुलांनी जबाबदारी पार पाडावी, असे अवाहन गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी केले.
बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये गटशिक्षणाधिकारी कार्यालय व शासनातर्फे तालुकास्तरीय चेतना कार्यक्रम करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून नाईक बोलत होत्या.
प्रारंभी गटशिक्षणाधिकारी नाईक व मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्राचार्या स्नेहा घाटगे यांनी, प्रत्येक शाळेने पुरातन व ऐतिहासिक पर्यटनस्थळांना भेटी देऊन त्यांचे महत्त्व मुलांना सांगण्याचे आवाहन केले. चेतना स्पर्धेचे तालुका नोडल अधिकारी महालिंगेश जे. यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास शिक्षण सहाय्यक एल.पी. मजलट्टी, ए. बी. होननायक यांच्यासह विविध शाळांतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.