
दिवसभर ढगाळ वातावरण : पाऊस येताच वीज गायब
निपाणी (वार्ता) : सलग दोन महिने पावसाने दडी मारली होती. त्यामुळे गेल्या महिन्यापासून उष्म्याध्ये वाढ झाली होती. अखेर मंगळवारी (ता.२८) दुपारी साडेबारा वाजता सुमारास निपाणी शहर आणि परिसरात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र पावसाला सुरुवात होताच वीज गायब झाल्याने बाजारपेठेतील व्यवसायिक आणि नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
मंगळवारी दुपारपर्यंत ढगाळ वातावरण झाले त्यानंतर अचानक निपाणी शहर आणि परिसरात पावसाची हजेरी लागली. त्यामुळे फेरीवाले व इतर व्यवसायिकांची तारांबळ उडाली. सुमारे पाऊण तास पडलेल्या या पावसामुळे शहरातील गटारी तुडुंब भरून रस्त्यावरून वाहत होत्या. त्यामुळे गटारीतील कचरा रस्त्यावर दिसून आला. एकंदरी या पावसामुळे उष्म्या पासून बचाव झाला असून नागरिकांनी सुटकेचा विश्वास सोडला.
पावसाअभावी रब्बी हंगामातील पेरणीची कामे उशिरा सुरू झाली. त्यामुळे पाणी असलेल्या शेतकऱ्यांनी ज्वारी, हरभरा व गव्हाची टोकननी केली आहे. या हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपडत असताना मंगळवारी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या पावसाचा तंबाखू, ज्वारी, गहू, हरभरा पिकांना लाभ होणार आहे. तर सध्या ऊस तोडणी सुरू असेल या पावसामुळे जमिनीत ओल झाल्याने काही ठिकाणच्या ऊस तोडणी खोळंबल्या आहेत.
—————————————————————–
विजेचा गडगडाट
मंगळवारी दुपारी पाऊस सुरू झाला. त्यानंतर विजेचा गडगडाट झाला. त्यामुळे पावसामध्ये वाढ झाली. परिणामी शहर आणि उपनगरातील काही भागात पाणी साठून राहिले होते. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली.
Belgaum Varta Belgaum Varta