राजू पोवार; ढोणेवाडी येथे जनजागृती
निपाणी (वार्ता) : सरकारने जाहीर केलेल्या सूचनेनुसार गतवर्षीच्या ऊसाला प्रतिटन १५० रुपये द्यावे. यंदाच्या हंगामात उसाला कारखान्यांनी ३५०० रुपये व सरकारने २ हजार रुपये द्यावे, या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे जनजागृती केली जात आहे. वारंवार निवेदने देऊनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने हिवाळी अधिवेशनात ७ डिसेंबर रोजी विधानसभेला घेराओ घालण्यात येणार आहे त्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केले. ढोणेवाडी येथे आयोजित रयत संघटना आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
राजू पोवार म्हणाले, यांना दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने सरकारने बेळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर केला आहे. पण अजूनही एकाही शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति एकर २० हजार तर इतर पिकांना प्रति एकर १५ हजार रुपये तात्काळ भरपाई मिळावी. शेतकऱ्यांना सध्या ७ तास वीज पुरवठा केला जात असून तो आता १२ तास करावा. याशिवाय गेल्या दोन वर्षापासून अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या पिकांचा नीपक्षपतीपणे सर्वे झालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी भरपाई पासून वंचित आहेत. यासह विविध मागण्यांसाठी घेराओ घालण्यात येणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
यावेळी एकनाथ सादळकर, सुभाष खोत, राजू कोपार्डे, बाबासाहेब निगवे, बाहुबली मेक्कळके, सागर माळी, बाबासाहेब सूर्यवंशी, दादासाहेब सादळरकर, दादासाहेब हिरीकुडे, प्रकाश घाटगे, प्रशांत सादरकर, शितल सूर्यवंशी यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी होते.