पोलीस बंदोबस्त कडक : आरटीपीसीआर रिपोर्टची मागणी
कोगनोळी (वार्ता) : कर्नाटकात शनिवार व रविवारी विकेंड जाहीर केल्यामुळे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची गर्दी कमी झाली होती. सीमा तपासणी नाक्यावर चार चाकी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. पण विकेंड जाहीर केल्याने कर्नाटकातील बाजारपेठ बंद असल्याने या ठिकाणी गर्दी अत्यंत कमी झाली आहे.
महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करणार्या वाहन धारकांच्याकडे आरटीपीसीआर रिपोर्टची मागणी करण्यात येत आहे. रिपोर्ट असणार्या प्रवाशांनाच कर्नाटकात सोडण्यात येत आहे. अन्यथा महाराष्ट्रात परत पाठवून देण्यात येत आहे.
गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी सीमा तपासणी नाक्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाण्यासाठी शासनाने आरटीपीसीआर रिपोर्टसह कोरोना लसीकरण झालेल्याचा दाखला असणे बंधनकारक आहे.
कर्नाटक लगत असणार्या महाराष्ट्रातील गडहिंग्लज, आजरा, उत्तूर, चंदगड यासह अन्य खेडेगावात जाणार्या प्रवाशांना आधार कार्ड पाहून सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर कागल येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहत, गोकुळ शिरगाव येथील औद्योगिक वसाहत यासह कोल्हापूर व अन्य ठिकाणी रोज ये-जा करणार्या कामगारांना या ठिकाणी सोडण्यात येत आहे. या कर्नाटक सीमातपासणी नाक्यावर निपाणी मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, उपनिरीक्षक सिद्रामप्पा उनद, सहाय्यक उपनिरीक्षक एस. आय. कंबार, पोलीस शिवलिंग हुग्गार, होमगार्ड झाकीर नाईकवाडे यांच्यासह अन्य पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.
