निपाणी (वार्ता) : नागपूर महापालिका आणि असोसिएशन फॉर रिसर्च ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अपूर्व विज्ञान मेळाव्यासाठी कर्नाटक प्रतिनिधी म्हणून डी. एस. शेवाळे व एस. एम. नदाफ यांना आमंत्रित करण्यात आले होते. पाच दिवस चाललेल्या विज्ञान मेळाव्यामध्ये देशभरातील विविध राज्यातील शिक्षकांना आमंत्रित केले होते. या मेळाव्यात विद्यार्थी व तज्ञ शिक्षकांना विज्ञानाचे प्रयोग व विज्ञान उपक्रम सादर करण्याची संधी मिळाली. सदर मेळाव्यात निपाणी येथील प्रयोगशील विज्ञान शिक्षक एस. एम. नदाफ व डी. एस. शेवाळे यांनी मांडलेल्या विज्ञान स्टॉलला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिली. त्यांच्या या प्रयोगांची माहिती घेऊन वरील दोघांनाही गौरवण्यात आले.
विविध प्रयोगांची माहिती घेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सर्वांना प्रोत्साहीत केले. यावेळी देशभरातील विज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी एआरटीबीएसईचे अध्यक्ष रघु ठाकूर, सचिव सुरेश अग्रवाल, ज्येष्ठ वैज्ञानिक डी. के. पांडे, मनपाच्या उपायुक्त आंचल सूद गोयल उपस्थित होते. सदर अपूर्व विज्ञान मेळाव्यास कर्नाटक प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्यासाठी निपाणीच्या क्षेत्रशिक्षणाधिकारी महादेवी नाईक, बी. आर. सी. प्रमुख आर. ए. कागे व शिक्षक संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांनी प्रोत्साहीत केले. यावेळी एस. एस. चौगुले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.