
निपाणी (वार्ता) : अयोध्या मधून येथे आलेल्या रामलला मंदिर अक्षता कलशांची शोभायात्रा अभूतपूर्व उत्साह व चैतन्यमय वातावरणात पार पडली. यामध्ये निपाणीसह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.
यावेळी महिलांनी अक्षतांचा मुख्य कलश व निपाणी क्षेत्रात येणाऱ्या सर्व विभागात पाठविण्यासाठी ८० मंगल कलशांची बांधणी व सजावट केली होती. सायंकाळी तमनाकवाडा येथील सच्चिदानंद स्वामी, हंचिनाळ (केस) मधील ईश्वरानंद स्वामी, समाधी मठातील प्राणलिंग स्वामी, शेंडूर ओमशक्ती मठ मधील आनंद तीर्थ स्वामी, दानम्मा देवी मठातील बसव मल्लिकार्जुन स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रोच्चारा मध्ये कलश पूजन झाले. त्यानंतर आरती व रामनामाचा जयघोष करण्यात आला.
आमदार शशिकला जोल्ले व नगरसेवकांच्या हस्ते आरती व कलश पूजन झाले. श्रीराम मंदिर ट्रस्टतर्फे स्वागत झाले. या सोहळ्यात वारकरी सांप्रदाय सहभागी झाला होता. शिरगुप्पी येथील कावळे महाराज, कापसे महाराज, यरनाळ मधील नवनाथ घाटगे महाराज, बुगडे आलूर येथील राजू पोतदार महाराज, शंकर हिरेमठ, बाबुराव महाजन महाराज यांच्यासह विविध साधुसंत उपस्थित होते.
बेळगाव नाक्यावरील श्रीराम मंदिरापासून कलश यात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर साखरवाडी मार्गावर भाविकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. कित्तूर चन्नम्मा सर्कल पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा नागरिक व व्यावसायिकांनी पुष्पवृष्टी केली.
कोठीवाले कॉर्नर परिसरात ट्रबलर्स ग्रुपतर्फे आतिषबाजी व पुष्पवृष्टी करून स्वागत केले. स्वस्तिक ट्रेडर्स तर्फे या मार्गावर रांगोळ्या रेखाटून आतिषबाजी करण्यात आली. महादेव गल्ली महादेव मंदिर, गांधी चौक ते कोठीवाले कॉर्नर या मार्गात महिलांची कलश दर्शनासाठी गर्दी झाली होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांना वंदन करून बेळगाव नाका मार्गे परत राम मंदिर येथे शोभा यात्रेची सांगता झाली. यावेळी भक्तांसाठी समाधी मठ येथे प्रसादाची व्यवस्था करण्यात आली. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Belgaum Varta Belgaum Varta