
अभियंते अधिकारी निरुत्तर: पाणी प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक
निपाणी (वार्ता) : शहरातील पाणीप्रश्नासंदर्भात सर्वपक्षीय नगरसेवक, पालिका प्रशासन व कंत्राटदार यांची संयुक्त बैठक नगरपालिकेत शुक्रवारी (ता.५) झाली. यावेळी नगरसेवकांनी कंत्राटदार अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. याशिवाय पाणीपुरवठ्यात व्यत्यय झाल्यास संबंधितावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.
नगरसेवक राजू गुंदेशा व संतोष सांगावकर यांनी, एप्रिलनंतर शहरात भीषण पाणीटंचाई होण्याची शक्यता असून त्यासाठी ठिकठिकाणी व्हॉल्व बसवून गळती रोखावी, असे सांगितले. नगरसेविका नीता बागडे यांनी, जैन इरिगेशनने कामगारांचा पगार का दिला नाही? याची विचारणा करताच कंपनीचे अभियंता रितेश मोहिते यांनी नगरपालिकेने कामाचे पैसे न दिल्याने कामगारांचा पगार थकल्याचे सांगताच नगरसेवकांनी त्यांची खरडपट्टी केली. कामाचे कंत्राट देताना पालिकेने पैसे दिल्यानंतरच कामगारांचा पगार द्यावा अशी कुठे तरतूद नसून केलेल्या कामाचा पगार वेळेत देण्याच्या सूचना दिल्या.
शहरात दररोज 10.8 लाख लिटर पाण्याची गरज आहे. वेदगंगा नदीतून दररोज 12 लाख लिटर पाण्याचा उपसा होतो. मात्र शुद्धीकरण आणि गळत्या यातून दररोज सुमारे अडीच लाख लिटर पाणी वाया जाते, असे जैन इरिगेशनचे अभियंता लक्ष्मीकांत यांनी सांगितले. त्यावर संतापलेल्या माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी, इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असताना जैन इरिगेशन आणि केयुआयडीएफसीचे अधिकारी गप्प कसे बसतात? असा सवाल केला. त्यावर अधिकारीही निरुत्तर झाले.
आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांनीही जैन इरिगेशन आणि केयुआयडीएफसीने तात्काळ कामात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, शौकत मणेर, दत्तात्रय नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेवक संजय सांगावकर, विनायक वडे, सद्दाम नगारजी, संतोष माने, संजय पावले, कावेरी मिरजे, आशा टवळे, गीता पाटील, सुजाता कदम, अरुणा मुदकुडे, शांता सावंत, रंजना इंगवले यांच्यासह पालिका, जैन इरिगेशन आणि केयुआयडीएफसीचे अधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta