
रावसाहेब पाटील, उत्तम पाटील यांचा सत्कार : शरद पवार यांची उपस्थिती
निपाणी (वार्ता) : माजी केंद्रीय कृषिमंत्री राष्ट्रवादीचे नेते शरद पवार मंगळवारी (ता.१६) निपाणीत येत आहेत. त्यांच्या हस्ते सहकाररत्न रावसाहेब पाटील व सहकाररत्न उत्तम पाटील यांचा नागरी सत्कार तसेच तालुक्यातील उत्तम पाटील गटाचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार व कार्यकर्ता कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आहे. येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे.

दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील (दादा) यांना कर्नाटक जैन असोसिएशन यांच्यावतीने जैनधर्मप्रभावक पुरस्कार व युवा नेते उत्तम पाटील यांना कर्नाटक राज्याचा सहकाररत्न पुरस्कार असे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. त्यानिमित्त त्यांचा शरद पवार यांच्या हस्ते गौरव होणार आहे. याशिवाय निपाणी तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच कुन्नूर व बारवाड या पीकेपीएसच्या पंचवार्षिक निवडणुकीत उत्तम पाटील गटाची एकहाती सत्ता आल्याने या नवनिर्वाचित संचालकांचाही सत्कारही होणार आहे.

कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे माजी मंत्री जयंत पाटील, माजी आमदार प्रा.सुभाष जोशी यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी कृतज्ञता मेळावाही पार पडणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत निपाणी मतदारसंघातून पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून उत्तम पाटील रिंगणात उतरले. यावेळी त्यांच्यामागे शरद पवार यांनी मोठी ताकद उभी केली होती. पवार यांच्यासह जयंत पाटील, डॉ. अमोल कोल्हे व दिग्गजांच्या निपाणी मतदारसंघात सभा पार पडल्या. या निवडणुकीत उत्तम पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकाचे ६६ हजारावर मते घेत सर्वांचेच लक्ष हे वेधले होते. त्यामुळे या निवडणुकीत सहकार्य केलेल्या मान्यवर, कार्यकर्ते व नागरिकांचे या मेळाव्यातून आभार व्यक्त करण्यात येणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या निपाणी दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सन्मान कृतज्ञता सोहळा कमिटीने केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta