राजेंद्र वड्डर : उद्घाटन होऊनही कामाला प्रारंभ नाही
निपाणी (वार्ता) : गळतगा- भिमापूरवाडी या एक किलो मीटर आंतरराज्य मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यासाठी नऊ महिन्यांपूर्वी मंत्री शशिकला जोल्ले यांनी कार्यकर्त्यासोबत वाजत गाजत रस्ता कामाचे उद्घाटन केले. पण प्रत्यक्षात कामाला प्रारंभ करण्यात आलेले नाही. त्यामुळे रस्त्याचा निधी गेला कुठे? असा सवाल व्यक्त करून तात्काळ काम सुरू न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर यांनी आयोजित पत्रकार बैठकीत केला आहे.
राजेंद्र वड्डर म्हणाले, गळतगापासून भिमापूरवाडी या अंतरराज्य महामार्ग फक्त नावालाच झाला असून रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. शिवाय रस्त्यावर डांबर दिसतच नाही. या महामार्गावर लहानमोठे अपघात होत असून तरीही याकडे मंत्री, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. नऊ महिन्यांपूर्वी मंत्री शशिकला जोल्ले यांनी धनगरी ढोल वादनाच्या गजरात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या 3054 योजनेतून मंजूर झालेल्या एक कोटी रुपयांच्या निधीतून रस्ता कामाचे उद्घाटन केले. नऊ महिने लोटले तरी रस्ता कामाला प्रारंभ करण्यात आलेला नाही. या रस्त्याचे काम निपाणी येथील ठेकेदाराला देण्यात आले असून ठेकेदाराकडूनही या रस्त्याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. गळतगा भागातील नागरिक निपाणी बेळगावला जाण्यासाठी खडकलाटच्या रस्त्याचा वापर करीत आहेत तर रोज नियमाने गळतगा बेडकीहाळ मार्गावरून फिरणार्या मंत्र्यांच्या गाड्या निपाणीहून चिकोडी मार्गे एकसंब्याला जात आहेत. कालच मंत्र्यांनी निपाणी ममदापुर मार्गासाठी निधी मंजूर झाल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. पण नऊ महिन्यांपूर्वी उद्घाटन केलेल्या रस्ता कामा विषयी मात्र काही बोललेले नाहीत. त्यामुळे मंजूर झालेला निधी वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेत.
याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता बेडकीहाळे यांना विचारले असता सध्या सर्व साखर कारखाने जोमात सुरू असून गळीत हंगाम सुरू असल्याने रस्ता काम करण्यात व्यत्यय येत असल्याचे कारण सांगत असून हे कारण चुकीचे असल्याचे सांगितले. एक किलो मीटरचा रस्ता करण्यासाठी नऊ महिने लोटले आता निपाणी इचलकरंजी या अंतर राज्य मार्गाचे दुरुस्ती करण्यासाठी किती वर्षे लागणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. रस्त्यावर ऊस वाहतूक करणारे बैलगाड्या, ट्रक, ट्रॅक्टर असे वाहनांची वर्दळ असते. रस्ता नसल्याने व वाहनांच्या वर्दळीमुळे धुळीचे साम्राज्य पसरत आहे. यातूनच रोज या मार्गावर अपघात होत आहेत. तरीही याकडे संबधीत अधिकारी वर्ग, लोकप्रतिनिधी अथवा मंत्री दुर्लक्ष करीत आहेत.
आतापर्यंत गळतगा गावातील विकास कामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात येत असून तेच निधी नंतर इतरत्र वापरण्यात येत आहे. येथील ग्राम दैवत रेणुका मंदिराजवळ खडकलाट मार्गावरील ओढ्यावर पूल वजा बंदारा मंजूर करून एक कोठी रुपयांचा निधी मंजूर केले होते. त्या कामाचा शुभारंभ होऊन तीन चार वर्षे लोटली तरी ते काम अद्याप झालेले नाही. तसेच खडकलाट मार्गावरील ओढ्यावर पाऊस पडल्यावर पाणी येऊन रस्ता बंद होते. त्यासाठी मोठे पूल मंजूर करून त्या कामाचा शुभारंभ करण्यात आले आणि तेही काम आजतागायत सुरूच झाले नाही. अशी अनेक कामे फक्त मंजूर होऊन कामाचा उद्घाटन झाले असून प्रत्यक्षात मात्र कामाला सुरुवात करण्यात आलेले नाही. असे सांगून राजेंद्र वड्डर यांनी याकडे ताबडतोब लक्ष द्यावे असे सांगितले अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे सांगितले.
