निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरातील नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा आवश्यक नाही. पाणी मीटर हे हवेच्या दाबाने फिरत आहे. त्यामुळे अनेक नागरिक पाणी बील आकारणी बाबतीत तक्रार करीत आहेत. पण संबंधित त्या बाबतीत लक्ष देत नाहीत. परिणामी हजारोंच्या पटीत अनेकांना पाणी बील आल्याने नागरीक त्रस्त आहेत. याशिवाय पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा पगारही थकवण्यात आला आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पूर्वीप्रमाणे वार्षिक पाणीपट्टी आकारून कर्मचाऱ्यांना पगार द्यावा, अशी मागणी माजी सभापती प्रा. राजन चिकोडे यांनी पत्रकान्व केली आहे.
पत्रकातील माहिती अशी, २४ तास पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत झाल्यापासून कोणत्याही प्रभागात स्वच्छ आणि सुरळीत पाणी पुरवठा झालेला नाही. कधी गढूळ तर कधी माती, शेवाळ मिश्रित पाणी पुरवठा केला गेला आहे. शिवाय २४ तास पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत कशी झाली, या चाचणीसाठी लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यावेळी पाईप लाईन मधील गळती दुरूस्तीला ही विलंब झाला हे नाकारता येणार नाही.
२४ तास पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत केली तरीही पाणी पुरवठा व्यवस्थित न होणे, अशुद्ध पाणी पुरवठा, मिटर पाणी बील तफावत अशा तक्रारी नागरिकांनी लेखी, तोंडी केल्या होत्या. याची दखल नगरपालिका सर्व साधारण सभेत घेऊन पुर्वीप्रमाणे वार्षिक पाणी बील भरून घेण्याविषयी चर्चा झाली होती. पण कार्यवाही झाली नाही. सध्या निपाणी शहरात भेडसावत असलेला पाणी प्रश्न हा गंभीर बनला आहे. तरी पाणी मिटर प्रमाणे येणारे पाणी बील अनेक नागरिकांना अयोग्य वाटत आहे. कामगारांना पगार वेळेवर मिळाला पाहिजे, यासाठी वार्षिक पाणी बील आकारणी करून पाणी पट्टी भरून घ्यावी. अन्यायकारक पाणी बील भरावे की नाही. याबाबतीत अनेक नागरिक संभ्रमात आहेत. जवाहर जलाशय पुर्ण क्षमतेने भरल्यानंतर शहराला व्यवस्थित पाणी पुरवठा सुरू झाला. नंतर २४ तास पाणी पुरवठा हवा आहे. त्यांनाच या योजनेत सहभागी करून घ्यावे, असे पत्रक माजी सभापती प्रा. राजन चिकोडे यांनी प्रसिद्ध साठी दिले आहे.