प्रा. डॉ. अच्युत माने : निपाणीत हुतात्मा दिन गांभीर्याने
निपाणी (वार्ता) : लोकशाही वृत्तीने चळवळ रुजली तरच आपल्या मागण्या मान्य होणार आहेत. अलीकडच्या काळात सौदेबाजी वाढले असून गुंडाचे राज्य सुरू झाले आहे. त्यामुळे भांडवलशाहीला उत्तेजन मिळत आहे. राजकारण आणि लोकशाही या दोन्ही बाजू वेगळ्या आहेत. तरुणाईला लोकशाहीच्या लढ्यात झोकून देऊन मराठी अस्मितेसाठी संघर्ष करावा लागेल, असे मत प्रा. डॉ. अच्युत माने यांनी व्यक्त केले. निपाणी भाग महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना आणि मराठी भाषिका तर्फे सोमवारी (ता.17) हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात आला. त्यानिमित्त साखरवाडी येथे आयोजित कार्यक्रमात प्रा. डॉ माने बोलत होते.
डॉ. माने म्हणाले, अलीकडच्या काळात लोकशाही मध्ये चळवळीचा जोश कमी होत आहे. शासनाच्या निर्बंध आत राहून संघटितपणे कार्य करण्याची वेळ आली आहे. प्रत्येकानी आप आपसातील राजकीय मतभेद बाजूला ठेवून सीमाप्रश्नासाठी एकत्र येणे आवश्यक आहे.
निपाणी भाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष जयराम मिरजकर म्हणाले, सन 1956 पासून सीमाप्रश्नाचा लढा निरंतरपणे सुरू आहे. सीमाभागातील मराठी बांधवांना कर्नाटकात डांबल्याने सध्या तिसरी पिढी त्यामध्ये उतरली असून न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. नेतेमंडळींच्या नाकर्तेपणामुळे या प्रश्नाची सोडवणूक झालेली नाही. केंद्र आणि महाराष्ट्र राज्य सरकारकडे त्याचा पाठपुरावा सुरू असून केंद्राबरोबर चर्चेची तयारी दाखवली आहे. महाजन अहवालात चुका असल्या तर त्या मान्य करून सर्वसामान्य मराठी भाषिकांना न्याय दिला पाहिजे.
प्रारंभी साखरवाडीमधील ज्येष्ठ नागरिक तुकाराम सावंत, निपाणी भाग महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष जयराम मिरजकर, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे, प्रा. डॉ. माने व मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा कमलाबाई मोहिते यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. तत्पूर्वी बेळगाव नाक्यावरील बॅरिस्टर नाथ पै. यांच्या पुतळ्यास मान्यवर व मराठी भाषिकातर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास प्रा. एन. आय. खोत, प्रा. भारत पाटील, विठ्ठल वाघमोडे, नवनाथ चव्हाण, प्रशांत नाईक, रमेश निकम, प्रशांत गुंडे, सचिन पोवार, बाळासाहेब तराळ, दादासाहेब खो, बाळासाहेब कळस्कर, हेमंत चौगुले, चंद्रकांत घोडके, संजय कुंभार, विनोद इंदलकर बाळासाहेब कमते, राजेंद्र शिंपुकडे, इर्शाद कोच्चरगी यांच्यासह मराठी भाषिक कार्यकर्ते उपस्थित होते. आशिष मिरजकर यांनी आभार मानले.
—-
व्यवहार बंद ठेवून प्रतिसाद
हुतात्मा दिनानिमित्त शिवसेना व महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शहरातील दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला मराठी भाषिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
Check Also
बोरगाव सातबारा वरील वक्फच्या नोंदी अखेर रद्द
Spread the love उत्तम पाटील यांच्या प्रयत्नांना यश; पूर्वीप्रमाणेच मिळणार उतारे निपाणी (वार्ता) : बोरगांव …