बदलत्या वातावरणाचा परिणाम : उत्पन्न जादा दिसत असले तरी व्यवसाय खर्चिक
निपाणी (वार्ता) : शेतीला जोडधंदा म्हणून बहुतांश शेतकरी वर्ग कुक्कुटपालन व्यवसायाकडे वेळलेला दिसत आहेत. निसर्गावर अवलंबून असलेली शेती व त्यातून मिळणार्या तोकड्या उत्पन्नावर उपजीविका करणे अवघड जात असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून निपाणीसह परिसरात आता शेतीपूरक जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय जोर धरत आहे. परंतु पोल्ट्री व्यवसाय करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. असेल त्या परिस्थितीमध्ये वातावरणाशी मिळतेजुळते घेऊन पोल्ट्री व्यावसायिकांना असलेल्या पक्ष्यांचे संगोपन करावे लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे इथला पोल्ट्री व्यावसायिक चिंताग्रस्त झालेला आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे एक ते 14 दिवसांच्या पक्ष्यांसाठी ब्रूडिंग मॅनेजमेंटवर बारकाईने लक्ष द्यावे लागत आहे. पोल्ट्री शेडमधील तापमान हे 28 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान ठेवावे लागते. त्यासाठी पोल्ट्री व्यावसायिक ब्रुडरस्टोव, ड्रम पेटवणे, इलेक्ट्रिक ब्रुडर, गॅस ब्रुडर, कोळसा पेटवणे इत्यादी तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. तर दिवसा पोल्ट्री शेडमध्ये तयार झालेला अमोनिया वायू बाहेर घालवण्यासाठी पडद्यांची योग्य उघडझाप करावी लागत आहे. पोल्ट्रीची संकल्पना, विचारधारा लक्षात घेता वाढलेले औषध, डिझेल दर, वीजदरवाढीचा शॉक , मजुरांचा वाढता पगार या आव्हानांनी पोल्ट्री व्यावसा यिकांच्या अडचणीत वाढ केलेली आहे. सध्याच्या काळामध्ये पोल्ट्री व्यावसायिक एखाद्या कंपनी बरोबर करार करून त्यांनी दिलेल्या पक्ष्यांचे संगोपन करावे लागत आहे.
—-
’पोल्ट्री व्यवसाय करताना प्रत्येक बॅचला येणारा नविन अनुभव काहीतरी शिकवून जातो. नक्कीच आव्हाने भरपूर आहेत. परंतु, त्याला सामोरे जाण्याचे सामर्थ्य प्रत्येक पोल्ट्री उद्योजकाने ठेवले पाहिजे. निसर्गातील बदलत्या वातावरणाचा आभास व पोल्ट्री क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अडचणींवर मात होऊ शकते.’
अमर अण्णासाहेब हजारे, पोल्ट्री व्यावसायिक, बेनाडी.
