
डॉ. प्रभाकर कोरे; निपाणीत महाआरोग्य शिबिर
निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षण सेवा देण्याच्या उद्देशाने केएलई संस्थेची स्थापना केली. त्यापाठोपाठ सेवा हा दृष्टिकोन ठेवून हॉस्पिटलची उभारणी केली. त्याच्या माध्यमातून हजारो रुग्णावर विविध प्रकारचे उपचार केले जात आहेत. लवकरच आयुर्वेदिक उपचार सेवा ही सुरू होणार असल्याचे केएलई संस्थेचे संस्थापक माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे यांनी सांगितले.

बेळगाव येथील केएलई संस्थेचे संचालक अमित कोरे फॅन क्लब, केएलई जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.२५) आय. बागेवाडी महाविद्यालयात आयोजित मोफत महा महाआरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप शिबिराचे उद्घाटन करून ते बोलत होते. शिबिरात १५ हजारावर रुग्णांची तपासणी करण्यात आली.
डॉ. कोरे म्हणाले, बेळगाव येथील आपल्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी चार देशातील रुग्ण येत आहेत. सध्या २४०० घाटांचे हॉस्पिटल असूनही ते कमी पडत आहे. नागरिकांची दिनचर्या, आहार, विहार बदलल्याने अनेक प्रकारचे रोग उद्भवत आहेत. दररोज १० पेक्षा अधिक कर्करोगाचे रुग्ण आढळत आहेत. सर्वसामान्य गरजू रुग्णावर वेळप्रसंगी मोफत उपचार केले जात आहेत. निपाणीकरांच्या मागणीनुसार लवकरच शहरात आयसीयू, डायलिसिस व इतर विभाग सुरु करण्याचा मानस आहे. विविध आजारावर मात करण्यासाठी रुग्णांनी आयुर्वेदावर विश्वास ठेवून उपचार करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी, डॉ. ए. व्ही. कोठीवाले यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी प्राचार्य एम. एम. हुरळी यांनी स्वागत केले.
डॉ. कोरे व मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.
शिबिरात केएलई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांसह २२० आरोग्य कर्मचाऱ्यांनी हृदयविकार, मूत्राशय, न्यूरोपॅथी, नेत्रोपचार, फुफ्फुस, हिप-जॉइंट, कान,नाक, घसा, थायरॉईड, कर्करोग, स्त्रीरोग, बालरोग, दंतरोग रुग्णांची तपासणी केली.
शस्त्रक्रियेची गरज असलेल्यांना बेळगावच्या रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात येणार आहेत. याशिवाय मोफत साखर, हिमोग्लोबिन, कॅन्सर, बीपी, ईसीजी आणि इको तपासणी करण्यात आली. शिबिरार्थीं साठी वाहन आणि जेवणाचीही व्यवस्था केली होती.
यावेळी व्हीएसएम संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, केएलईचे संचालक अमर बागेवाडी, मल्लाप्पा कोरे बसवराज पाटील, रोटरीचे अध्यक्ष विरू तारळे, सेक्रेटरी राजेश तिळवे, राजेश पवार, महेश बागेवाडी, अशोककुमार असोदे, गजेंद्र तारळे, मल्लिकार्जुन गडकरी, रवींद्र शेट्टी, समीर बागेवाडी, प्रताप मेत्राणी, डॉ. एस. आर. पाटील, संजय पाटील, डॉ. आल्लमप्रभू, सुनील पाटील, विजय मेत्राणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta