Saturday , July 27 2024
Breaking News

विरोधकांनी शहरवासीयांची दिशाभूल थांबवावी : नगराध्यक्ष भाटले

Spread the love

सत्ताधारी गटाची बैठक

निपाणी (वार्ता) : गेल्या पंचवीस ते तीस वर्षात निपाणीचा जो विकास झाला नाही, तो विकास  पाच वर्षात करून दाखवण्याचे काम मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी करून दाखविले आहे. शहरासह मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची कामे केली असताना त्यांच्या कार्यपद्धतीवर विरोधी गटातील काही नगरसेवकांनी  बिनबुडाचे आरोप करून शहरवासीयांची दिशाभूल चालवली आहे. विरोधकांच्या या भूलथापांना शहरवासीयांनी बळी पडू नये, असे आवाहन नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी केले. मंगळवारी (ता.२५) दुपारी नगरपालिकेत आयोजित सत्ताधारी गटाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष नीता बागडे, सभापती सद्दाम नगारजी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
नगराध्यक्ष भाटले म्हणाले, नामदार शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे सर्व नगरसेवक आपल्या प्रभागाचा विकास प्रामाणिकपणे काम करत आहेत. नामदार व खासदारांनी नगरोत्थान योजनेतील अनेक तांत्रिक त्रुटी दूर केल्यामुळे या योजनेमधील सर्व कामे सुरळीतपणे चालू आहेत. शहरातील राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनाचा प्रश्न सन २००९ पासून रखडला होता. त्यासाठी एस एफ सी फंडातून जोल्ले यांनी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अशी शाश्वत विकास कामे त्यांनी केली आहेत. विरोधकांनी त्यांच्या  कार्यकाळात दत्त खूले नाट्यग्रहासाठी ४० ते ५० लाख रुपये खर्च केले. मात्र त्यामधून काहीच साध्य झाले नाही. जवाहर जलाशयाला विनाकारण कंपाउंड केले. संभाजी चौक ते कोल्हापूर सर्कल दरम्यान असणाऱ्या स्ट्रीट लाईट अद्यापही बंद असून ते ९५ बल्ब कुठे गेले? याचे उत्तर विरोधकांनी द्यावे. जोल्ले यांच्यावर टीका करत असताना विरोधकांनी आपली पात्रता काय आहे, हे तपासून पाहून आपण शहरात किती कामे केली याचाही विचार करावा असेही ते म्हणाले.
शहरात निपाणी नगरपालिकेच्या माध्यमातून विविध विकास कामांना चालना मिळाली असून सर्व नगरसेवक शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. शहरात विविध ठिकाणी सीसी कॅमेरे बसवले जाणार आहेत. तसेच २४ तास पाणी योजनेतील तांत्रिक दोष जवळपास दूर केले असून नागरिकांनी काटकसरीने पाणी वापर करावा. शहरात ज्या ठिकाणी समस्या आहेत. त्यासाठी हेल्पलाईन वर तक्रार नोंदवावी. विविध प्रभागात कामे सुरू असून येणाऱ्या काळात नवीन कामासाठी निविदा मागवून विविध योजनेमधून शहराचा सर्वांगीण विकास केला जाणार असल्याचेही बाटले यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक राजू गुंदेशा, संतोष सांगावकर, उदय नाईक, विजय टवळे, रवी कदम, विनोद बागडे यांच्यासह सत्ताधारी गटाचे नगरसेवक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शेतकरी वाहनांना टोल माफी मिळावी

Spread the love  रयत संघटनेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *