१९ व्या वर्षीच मिळवले यश : निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा
निपाणी (वार्ता) : भारतीय सेनेतील तीनही तुकड्यांत निपाणी आणि परिसरातील दिवस आघाडी घेत आहेत. नुकत्याच लेफ्टनंटपदी विराजमान झालेल्या रोहित कामत यांच्यानंतर निपाणी येथील सर्वसामान्य कुटुंबातील १९ वर्षीय तुषार शेखर भालेभालदार यांनी नौदलात आपली चमक दाखविली आहे. आपल्या कौशल्याच्या आधारावर नौदलात भरती होवून खडतर प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण करून नौदलात एसएसआर पद प्राप्त करून परतलेल्या तुषार यांचे निपाणीकरांनी जल्लोषी स्वागत केले.
तुषार हा सर्व सामान्य कुटुंबातील असून त्यांने नौदलात सहभागी होण्याचे ध्येय बाळगून त्याच्या पूर्ततेसाठी परिश्रमपूर्वक पाच महिन्यांच्या सरावानंतर याठिकाणी सैनिकासाठी अत्यंत महत्वाचा असणारा ‘कसम विधी’ २१ जानेवारीला पार पडला. त्यानंतर तो आपल्या मायभूमी निपाणीस परतला आहे. निपाणीत प्रथम केएलई येथे त्यांच्या निवडीबद्दल महाविद्यालयीन प्रशासनाकडून त्यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर जत्राट वेस येथील महात्मा बसवेश्वर चौक येथून फुलांची आरास केलेल्या खुल्या जीपमधून फूलांचा वर्षाव करीत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील व मान्यवरांनी पुष्पहार घालून फटाक्यांची आतिषबाजी करून त्यांचे स्वागत केले.
हणबर गल्ली येथील नागरीकांच्या वतीने भालेभालदार यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर महादेव मंदिर येथे भागातील अनेक नागरीकांनी त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला. वक्फ, धर्मादाय व हाज मंत्री शशीकला जोल्ले यांनी दूरध्वनीवरून तुषार यांच्याशी संवाद साधून त्यांना निवडीबध्दल शुभेच्छा दिल्या. नगराध्यक्ष जयवंत भाटले, रविंद्र शेट्टी, राजू पाटील, नगरसेवक दिपक पाटील, प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी, एनसीसी अधिकारी सिध्दू उदगट्टी, संजय मोळवाडे, माजी नगरसेवक रविंद्र चंद्रकुडे, नितीन गुरव, योगेश भालेभालदार, शिवकांत चंद्रकुडे, लक्ष्मण भालेभालदार, अमोल चंद्रकुडे, युवराज कदम, आदीनाथ पाटील, आनंद हुक्केरी यांच्यासह श्रीराम सेना हिंदुस्थान, नवनिर्माण कर्नाटक संघ, दानम्मादेवी ट्रस्ट आदी संघटनांच्या वतीने तुषार यांना गौरविण्यात आले.