कोगनोळी : येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे शेती मदतनीस दगडू ठाणेकर यांची मुलगी धनश्री हिला शेती प्रगती यांच्यावतीने कृषिभूषण हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामुळे तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
हा पुरस्कार सोहळा निमशिरगांव येथील धर्मनगर तीर्थक्षेत्र येते शनिवार तारीख 5 फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
मुळगाव सिद्धनेर्ली तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील धनश्री दगडू ठाणेकर हिने कृषी क्षेत्रात नाविण्यपुर्ण काम करणारी युवा शास्त्रज्ञ असे नांव कमवले आहे. घरची परिस्थिती हलाकीची असताना देखील जिद्दीने आपले उच्च शिक्षण नुकतेच पुर्ण केले आहे. नुकतेच परभणी कृषी विद्यापीठामधून एमस्सीचे शिक्षण पूर्ण करत अनेक पिकांवर संशोधन करून युवा कृषी शास्त्रज्ञ म्हणून ठसा उमटविला आहे. त्यांनी हरभरा पिकावर नॅनो तंत्रज्ञानाचा होणारा परिणाम आणि त्यापासून मिळणारे उत्पादन या विषयाचा विशेष अभ्यास केला आहे. त्यांनी आपल्या संशोधन अभ्यासामध्ये एकूण दहा प्रक्रियांव्दारे हरभरा पिकाचा विशेष अभ्यास केला आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर प्रायोगिक प्रयोग घेवुन नॅनो तंत्रज्ञानाचा हरभरा पिकाच्या उत्पादनामध्ये कसा बदल होतो. हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे. त्यांच्या या प्रयोगाची विद्यापीठाने विशेष नोंद घेतली आहे. एक उभरती युवा कृषी शास्त्रज्ञ म्हणून धनश्री ठाणेकर यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचे संशोधन काम विशेष मानले जाते. त्याच्या या ज्ञानाची कृषी क्षेत्रात निश्चित मदत होईल असे मानले जात आहे.
