Saturday , July 27 2024
Breaking News

धनगर आजोबांचा प्रामाणिकपणा…

Spread the love

संकेश्वर (प्रतिनिधी) : तुम्ही काळजी नगा करु, तुमचं सोनं पैसे, मोबाईल माझ्याकडे आहे. निवांत या अन् घेऊन जा. असे खानापूर तालुका हुक्केरी येथील धनगर समाजाचे आजोबा मुत्याप्पा हालप्पा हालबगोळ यांनी मोबाईलवरुन कोल्हापूरच्या सौ. सुवर्णा चौगुले यांना सांगताच सुवर्णा यांना देवदूत भेटल्याचा आनंद झाला. सोने, पैसे, मोबाईल, आधारकार्ड हरविलेल्या सुवर्णा यांना मोठा शाॅक (हादरा) बसला होता.आजोबांच्या काॅलने त्यांचे जीव भांड्यात पडला. घटना तशी अगदीच रोचक घडली आहे. बुधवारी कोल्हापूरच्या सौ. सुवर्णा सुभाष चौगुले या बेळगांव आलतगा येथून ॲक्टीवा दुचाकीने कोल्हापूरकडे जाताना वाटेत धक्क्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठन तुटले. त्यामुळे त्यांनी पती सुभाष चौगुले यांना दुचाकी रस्ता शेजारी थांबविण्यास भाग पाडले. सौ. सुवर्णा यांनी चाळीस ग्रॅम वजनाचे गळ्यातील तुटलेले सोन्याचे गंठन, नेकलेस आपले पर्समध्ये ठेवले. पर्समध्ये रोख पाच हजार रुपये, आधारकार्ड, आरटीपीसीआर टेस्ट प्रमाणपत्र ठेवून ते एका पिशवीत घालून पिशवी ॲक्टीवाच्यापुढे सुरक्षित ठेवून दिली. ते कोल्हापूरकडे जाताना चिकालगुड्ड हेब्बाळनजिक स्पीड ब्रेकरच्या धक्क्याने त्यांची पिशवी वाटेत पडली. अगदी त्याचवेळी त्यांच्या मागून दुचाकीने येणारे मुत्यप्पा हालबगोळ यांनी ते पाहिले. पिशवी हातात घेऊन त्यांनी चौगुले यांना जोराने हाक दिली पण हेल्मेटमुळे चौगुले यांना ते ऐकू आले नाही. त्यामुळे ते तसेच कोल्हापूरला निघून गेले. गावात गेल्यानंतर त्यांना पिशवी वाटेत कोठेतरी पडल्याचे लक्षात आले. सौ. सुवर्णा यांना मोठा धक्का बसला. काय करावे त्यांना सुचेना अखेर त्यांनी आपल्या मोबाईलला काॅल केला. रिंग होत होती पण कोणी काॅल रिसिव्ह करेना म्हणून ते आणखी विचारात पडले. आजोबांना मोबाईल काॅल कसे रिसिव्ह करावयाचे ठाऊक नसल्याने ते घरात येऊन मिळालेली पिशवी घरातील लोकांना दाखविली. मिळालेल्या मोबाईलवरुन आलेल्या काॅलवर संपर्क साधताच चौगुले यांनी तो घेतला. आजोबांनी मोबाईलवरुन सौ. सुवर्णा यांना धीर देत सांगितलं. कायबी काळजी करु नका, तुमचं पर्स माझ्याकडे आहे. निवांत गुलाबशाह दर्गाजवळ या तुमच पर्स घेऊन जा. असे सांगताच सुवर्णा यांना देवदूत भेटल्याचा आनंद झाला. सुवर्णा सुभाष यांनी आजोबांनी सांगितलेल्या ठिकाणी जाऊन त्यांची भेट घेतली. आजोबांनी मिळालेली पिशवी जशास तसे त्यांना सोपविली. पिशवीतील पर्समध्ये चाळीस ग्रॅम वजनाचे गळ्यातील सोन्याचे गंठन नेकलेस, रोख पाच हजार रुपये, आधारकार्ड आरटीपीसीआर टेस्ट प्रमाणपत्र असे सर्व काही होते. धनगर आजोबांच्या प्रामाणिकपणाचे चौगुले कुटुंबियांनी तोंडभरून कौतुक करुन त्यांचे शतशः आभार मानले. धनगर आजोबा मुत्याप्पा हालप्पा हालबगोळ यांच्या प्रामाणिकपणाचे शिवा बोरगांवी, प्रकाश कानवडे यांनी विशेष अभिनंदन केले आहे. आजच्या जमान्यात प्रामाणिकपणा जीवंत ठेवण्याचे कार्य मुत्याप्पा हालबगोळ सारख्या व्यक्तींकडून केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

डेंग्यूमुळे संकेश्वर येथे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर येथील एका चिमुरडीचा डेंग्यूच्या आजाराने गुरुवारी मृत्यू झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *