निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण घटक समिती (ग्रामीण)ची व्यापक बैठक संपन्न
निपाणी : निपाणी तालुक्यातील तमाम मराठी भाषिकांची व्यपाक बैठक मत्तीवडे ता. निपाणी येथे प्रा. डॉ. भारत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सुरुवातीला उपस्थित कार्यकर्त्यांचे स्वागत आमचे मार्गदर्शक भाऊसाहेब पाटील यांनी केले.
प्रस्तावना अजित पाटील यांनी केली. बैठकीचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, निपाणी तालुक्यातील मराठी माणूस सीमाप्रश्नाच्या लढ्यापासून दुरावला आहे. तो पुन्हा एकत्र येण्यासाठी नवीन तालुका महाराष्ट्र एकीकरण घटक समिती (ग्रामीण) निपाणीची घोषणा करावी अशी तालुक्यातील ज्येष्ठ व तरुणांची मागणी लक्षात घेऊन आज यासाठीच ही तालुक्यातील मराठी भाषिकांची व्यापक बैठक बोलविण्यात आली आहे.
बंडा पाटील म्हणाले की, निपाणी तालुक्यातील मराठी भाषिकांची पुन्हा एकजूट करायची असली तर सर्वच मराठी लोकांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनी विधानसभा निवडणूकीमध्ये घवघवीत विजय संपादन करायचा आहे. विधानसभा विजयाचा इतिहास त्यांच्यासमोर उभा केला पाहिजे आणि त्याची आठवण करून दिली पाहिजे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे संघटन बळकट केले तर आलेली मरगळ दूर होईल व पुन्हा गतवैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आहे, महाराष्ट्र एकीकरण समितीपासून दूर गेलेल्या कार्यकर्त्यांना लढ्याचा इतिहास, जुन्या नेत्यांनी दिलेले योगदान त्यांच्यासमोर अधोरेखित करावे लागणार आहे. सीमाप्रश्नाचा लढा ७१ वर्षांचा झाला आहे. एवढ्या दीर्घ पल्ल्यामध्ये वैयक्तिक हेवेदावे झाले असतील, कुणाच्या आर्थिक अडचणी, कुणाच्या पोलीस स्टेशनच्या अडचणी राष्ट्रीय पक्षातील नेत्यांनी कुणाला किरकोळ पद दिली असतील, काहीअंशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांचे दुर्लक्ष झाले असेल, वरील सर्व कारणाने निपाणी तालुक्यातील मराठी माणूस समितीपासून दुरावला आहे.
हिंदुराव मोरे म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण समिती नव्याने घोषित करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. याचा विस्तार वाढविण्यासाठी प्रत्येक गावामधील कार्यकर्त्यांना भेटून समितीची का गरज आहे याची आठवण करून देऊया. मराठी लोकांच्या मनामध्ये समितीविषयी खूप गैरसमज निर्माण झालेले आहेत ते पहिल्यांदा दूर केले पाहिजेत. त्यासाठी ४८ गावांचा संपर्क दौऱ्याचा आराखडा तयार करावा लागेल, कार्यकारिणीमध्ये प्रत्येक गावातून किमान दोन व्यक्तीचा समावेश झालाच पाहिजे, अशा पद्धतीने नियोजन सर्वजण एकत्र येऊन करूया.
बैठकीला उपस्थित असणारे यामधील कोण कोण कार्यकरिणी सदस्य म्हणून समितीमध्ये काम करण्यास इच्छुकांची नावे घेतली व उर्वरित निपाणी तालुक्यातील ४८ गावांचा दौरा करून कार्यकारिणीमध्ये समावेश झालेल्या सदस्यांची व्यापक बैठक घेऊन, पदाधिकाऱ्यांची निवड ज्यांची – ज्यांची इच्छा असेल त्यांनी त्या बैठकिमध्ये आपली मते स्पष्ट शब्दात मांडावीत आणि पदाची जबाबदारी घ्यावी, सर्वांच्या मतांचा व भावनेचा आदर करून पदभार द्यावा.
आनंदा रणदिवे म्हणाले, सीमाप्रश्नाची सध्यस्थिती सुप्रीम कोर्टामध्ये काय आहे, याची माहिती करून घेतली पाहिजे. सुप्रीम कोर्टाची तारीख दोन वर्षे झाली आलेली नाहीच, सुनावणी घेण्यासाठी चालढकलपणा सुरु आहे, याची कारणे सामान्य मराठी भाषिकांना कळाली पाहिजेत, सर्वानूमते घटक समितीची घोषणा करण्याचे ठरले व याला संमती दर्शविण्यात आली. कोल्हापूर व हातकणंगलेचे नवनिर्वाचित दोन्ही खासदारांचे अभिनंदन करण्यासाठी कोल्हापूरला त्यांच्या निवासस्थानी जाऊन व सीमाप्रश्न तज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांना भेटून सीमावासीयांसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व पक्षीय सीमाप्रश्न चिंतन बैठक घ्यावी अशी नम्र विनंती करणार. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ निपाणी तालुक्यातील रुग्णाना अजूनपर्यंत झालेला नाही, त्याची जबाबदारी प्रत्येक तालुक्यातील एका कार्यकर्त्यांकडे दिली पाहिजे, तरच याचा फायदा निपाणी तालुक्यातील लोकांना होणार आहे. ८६५ गावाव्यतिरिक्त नंतर लोकसंख्या वाढत गेली त्यामुळे नवीन वाड्या, वास्त्या तयार झाल्या आहेत. त्यांचा समावेश ८६५ गावामध्ये केला तर त्या लोकांना पण महाराष्ट्र सरकारच्या नोकरीचा, योजनेचा, लाभ मिळणार आहे. या अडचणीमुळे बरेच विद्यार्थी, सरकारी नोकरीपासून वंचित आहेत, याचा विचार गांभीर्याने महाराष्ट्र सरकारने केला पाहिजे, पुन्हा एकवेळ सर्वांनी निपाणी तालुक्यातील मराठी भाषिक लोकांना जाहीर आवाहन करून सांगितले. वैयक्तिक हेवेदावे, मतभेद, राग, रुसवेफुगवे विसरून सीमाप्रश्नाच्या लढ्यासाठी एकत्र येऊया.
यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी, सहसंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देऊन मत्तीवडे गावातील परिसर दणाणून सोडण्यात आला.
शेवटी आभार गणेश माळी यांनी मानले.
बैठकीला बंडा पाटील, हिंदुराव मोरे, भाऊसाहेब पाटील, प्रा. डॉ. भारत पाटील, प्रा. विजय कांबळे, संतोष निढोरे, अजित पाटील, आनंदा रणदिवे, शिवाजी पाटील, पांडुरंग डोंगळे, शिवाजी जाधव, बाबुराव मोरे, सोपान साठे, अप्पासो साठे, लक्ष्मण कांबळे, सचिन पाटील, अमोल पाटील, अमोल शेळके, सुरेश पाटील, बाबुराव पाटील आदी उपस्थित होते.