जमिनीचे आरोग्यही बिघडले
कोगनोळी : अलीकडे शेतीमध्ये तणनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मजुरांपेक्षा कमी खर्चात मरणारे तण आणि दिवसभर मजुरांच्याकडून काम करुन घेण्यासाठी करावी लागणारी दगदग यामुळे प्रत्येकजण सहजासहजी उपलब्ध होणारे आणि अलीकडच्या विद्युत फवारणी पंपांच्यामुळे कमी त्रासात होणारे काम म्हणून तणनाशकच वापरु लागला आहे. त्यामुळे साहजिकच शेतमजुरांचा रोजगार हिरावला जाऊ लागला आहे.
पूर्वी शेतात भांगलण, कोळपण, इतर मशागतीची कामे मोठ्या प्रमाणात असायची. याला कारण म्हणजे बैलाच्या साहाय्याने केली जाणारी शेती. पिकातून खुरपे फिरल्यावर पिक तरारुन उठते अशी मानसिकता असणाऱ्या काळात शेतशिवारात गाण्याच्या तालावर होणारी भांगलण शिवार भारुन टाकायची. परंतु अलीकडे मशागतीसाठी यांत्रिक अवजारे आल्यामुळे खोल नांगरट होऊन तणाचे बी अतिखोल जाऊन बसते. त्यामुळे देखील तण नियंत्रण होऊन मजुर कमी लागतात.
सध्या शेतमजुर महिलेला दिवसाला १५० रुपये पगार दिला जातो तर पुरुष मजुराला ३०० रुपये पगार दिला जातो. वाढलेल्या महागाईच्या तुलनेत शेतमजुरांचा पगार वाढला नसल्याने हातावरचे पोट असणाऱ्यांची मोठी गोची झाली आहे. तणनाशक मारणारे मजुरही निर्माण झाले आहेत. एका पंपाला ५० रुपयेप्रमाणे दिवसभरात १० ते २० पंप औषध मारुन जीव धोक्यात घालणारा मजुरांचा ग्रुप तयार झाला आहे. दरम्यान तणानुसार तणनाशकाचे प्रकार उपलब्ध आहेत.