निपाणी (वार्ता) : ‘गोविंदा रे गोपाला’चा गजर, तरुणाईचा नृत्याचा ठेका, अधून, मधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी, गगनाला भिडलेला आवाज अशा वातावरणात निपाणीत दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला. येथील दिवंगत दौलतराव पाटील सोशल फाऊंडेशन, हेल्थ क्लब व पैलवान अजित नाईक युवाशक्ती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिरोळ येथील अजिंक्यतारा गोविंदा पथकाने दोन वेळा सलामी देऊन सात थर रचून दहीहंडी फोडली. या पथकाला दीड लाख रुपयांचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आमदार काकासाहेब पाटील उपस्थित होते.
प्रारंभी कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील, राहुल जारकीहोळी व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन व उद्घाटन झाले. त्यानंतर प्रदीप सातवेकर यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार झाला.
सर्वप्रथम साखरवाडी येथील गोविंदा पथकाने मनोरे रचत दहीहंडीला सलामी देण्याचा प्रयत्न केला. रात्री साडेआठ वाजल्यापासून गोविंदा पथक येथील म्युनिसिपल हायस्कूल समोर आयोजित कार्यक्रम ठिकाणी येत होते. त्यामध्ये निपाणी परिसरासह महाराष्ट्रातील गोविंदा पथकांचा समावेश होता.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, निपाणीचा ऋणानुबंध कायमपणे आहे. आता तिसऱ्या पिढीमुळे हे ऋणानुबंध घट्ट झाले आहेत. खासदार प्रियांका जारकीहोळी या तरुण नेतृत्वाला चिक्कोडी मतदार संघाने स्वीकारले आहे. त्यांच्याकडून अनेक विकास कामे होतील. या खेळामध्ये सर्वात खालचा स्तर महत्त्वाचा आहे. त्यावर विश्वास ठेवून प्रत्येकांनी काम करण्याचे आवाहन केले. या स्पर्धेसाठी १५ संघाना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी गडहिंग्लज येथील संघर्ष ग्रुपने सहा थर रचत सलामी दिली. पण त्यांना दहीहंडीपर्यंत पोहोचता आले नाही.
यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, पैलवान अजित नाईक, सुप्रिया पाटील, अभिजीत पाटील -बेनाडीकर, सुजय पाटील, प्रवीण भाटले, राजेंद्र वडर, चंद्रकांत जासूद, सुरेश घाटगे, नवनाथ चव्हाण, पंकज पाटील, प्रतिक शहा, रवींद्र श्रीखंडे, विश्वास पाटील, विजय शेटके, झाकीर कादरी यांच्यासह निपाणी व परिसरातील मान्यवर उपस्थित होते.