
संबंधित कुटुंबीयांना जागेची हकपत्र; ४० वर्षानंतर समस्येचे निराकरण
निपाणी (वार्ता) : शहरात उपनगरांच्या माध्यमातून दिवसेंदिवस व्याप्ती वाढत आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाले आहेत. येथील देवचंद महाविद्यालय परिसरातील धर्मवीर छत्रपती संभाजीनगर येथे रस्त्यावर अतिक्रमण करून घर बांधण्यात आले होते. अनेक वर्षांपासून नागरिकांना मुख्य रस्त्यापासून दूर राहावे लागले होते. अखेर निपाणी नगरपालिकेतर्फे रस्त्यावरील अतिक्रमण केलेले घर पाडण्यात आले. शिवाय संबंधित कुटुंबीयांना जागेची हकपत्रेही वाटप करण्यात आली. परिणामी अनेक वर्षापासून असलेली समस्या निकालात निघाली आहे.
संभाजीनगर रस्त्यावरील अतिक्रमणा विषयी परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा निवेदनातून पालीकेकडे अडथळे दूर करून रस्ता खुला करून देण्याची मागणी केली होती. पण या कामाला सुरुवात झाली होती. तीन दिवसापूर्वी नगराध्यक्षा सोनल कोठडीया आणि नगरपालिका आयुक्त दीपक हरदी यांना निवेदन देण्यात आले होते. पालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या मागणीची दखल घेतली शनिवारी (ता.४) प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केली. रस्त्यामध्ये अडथळा होणाऱ्या घरकुलाविषयी सकारात्मक विचार करण्यात आला. त्यानुसार लक्ष्मी सदाशीव पाटील यांना शिंदे नगरात घरकुल देण्यात आले. तर श्रावण चंद्रकांत कोळी व तुकाराम कृष्णा कोळी यांना शिंदे नगरातच भूखंड देण्याची कार्यवाही करण्यात आली. यानंतर मार्गावरील अडथळे दूर करण्यास प्रारंभ करण्यात आला. नगरपालिकेच्या जेसीबीद्वारे सुरू झालेल्या कार्यवाहीमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
कारवाईच्या वेळी बोलताना नगराध्यक्षा सोनल कोठडीया यांनी संभाजीनगर येथे असणाऱ्या रस्त्यावरील अडथळ्यांविषयी परिसरातील नगरातील नागरिकातून अनेक वर्षापासून तक्रारी होत्या. अडथळे दूर करण्याची मागणी केली होती.सन २०१७मध्ये आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून आश्रय समितीच्या माध्यमातून घरकुल हकपत्रांचे वितरण देखील विस्थापितांना करण्यात आले होते. पण त्यानंतर निवडणुका आणि आचारसंहितामुळे हे काम रखडले होते. नगरपालिका सभागृह अस्तित्वात आल्यानंतर याच्या प्रत्यक्ष कार्यवाही प्रारंभ करण्यात आला. नागरिकांच्या मागणीची दखल घेत ही कार्यवाही करण्यात आली. लवकरच या मार्गावरील अडथळे दूर झाल्यानंतर सुसज्ज रस्ता निर्माण केला जाणार आहे. आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी शहर व उपनगरांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. निपाणी शहर व उपनगरातील समस्या मार्गी लावण्याचे काम केले जात आहे. अतिक्रमणाच्या तक्रारी देखील अनेक ठिकाणी आहेत. याची परिपूर्ण माहिती घेऊन योग्य कार्यवाही करण्यासाठी पालिका सभागृह कटिबद्ध आहे. निपाणी चा सर्वांगीण विकास हेच मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवक शौकत मनेर यांनी, गेल्या ४० वर्षापासून रस्त्यावर अतिक्रमण व रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता. नगरपालिका पदाधिकारी व आयुक्तांच्या पुढाकाराने हा प्रश्न निकाली निघाला आहे. संबंधितांना जागेचे हकपत्रही घेण्यात आल्याचे सांगितले. रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत नगरपालिका सह इतर पदाधिकाऱ्याकडे पाठपुरावा केल्याने नगराध्यक्ष सोनल कोठडीया, आयुक्त दीपक हरदी आणि नगरसेवकांच्या पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लागल्याचे सामाजिक कार्यकर्ते पंकज गाडीवड्डर यांनी सांगितले.
यावेळी उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर सभापती डॉ. जसराज गिरे नगरसेवक विलास गाडीवड्डर, शौकत मणेर, कावेरी मिरजे, सुजाता कदम, आयुक्त दीपक हरदी, राजेश कोठडीया, सागर मिरजे, रवीऊ कदम, प्रवीण कणगले, सागर मेस्त्री, विशाल लाटवडे, अनिल कलगुटगी, चंदू कलगुटगी, मारुती कलगुटगी यांच्यासह पालिका अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta