

कर्नाटक राज्य रयत संघटनेचे बैठक
निपाणी (वार्ता) : सध्या बेळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची धामधुम सुरू आहे. त्याच्याशी संघटनेचा कोणताही संबंध नाही. निपाणी तालुक्यातील दोन उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आतापर्यंत त्यांनी कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांना सहकार्य केलेले नाही. असे असताना आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी निवडणूक लढवीत असल्याचे सांगत आहेत. हे पूर्णपणे चुकीचे असून शेतकऱ्यांचा हा अवमान आहे. खरोखरच शेतकऱ्यांचे हित जोपासायचे असेल तर दोन्ही उमेदवाराकडे साखर कारखाने असून त्यांनी यंदाच्या हंगामातील ऊसाला प्रति टन ४ हजार रुपये दर जाहीर करूनच साखर कारखाने सुरू करावेत, असे आवाहन कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केले. रविवारी (ता.१२)रयत संघटनेच्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
पोवार म्हणाले, यंदा झालेल्या अति वृष्टीमुळे सलग तीन वेळा पूर परिस्थिती निर्माण झाली. शिवाय शेतात पाणी साचून ऊस, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. परिणामी शेतकरी कुटुंबावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. शासनातर्फे सर्वे झाला असला तरी अजूनही भरपाई मिळालेली नाही. सध्या दिवाळी सण तोंडावर आला असून हा सण साजरा करायचा की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा आहे.
तालुक्यातील दोन्ही उमेदवाराकडे साखर कारखाने असून इर्षेपोटी राजकारण करण्यापेक्षा ऊस दराची इर्षा करून एकापेक्षा एक असे जादा दर दिल्यास शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने हित जोपासले जाणार आहे.
सध्या तालुक्यात सत्ता, संपत्तीसाठी शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःची पोळी भाजून घेतली जात आहे. शेतकऱ्यांचे नाव घेऊन राजकारण करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. शिवाय एका मतासाठी तीन लाख रुपये देत असाल तर त्यामध्ये शेतकऱ्यांचे कोणते हित आहे? शिवाय ही रक्कम आली कुठून? असा सवाल आहे.
तालुक्यातील नेत्यांनी राजकारणाची पातळी ओलांडली असून शेतकरी व नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. शिवाय यावर्षी उसाचे नुकसान झाले असून उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी दर जाहीर केल्याशिवाय शेतकऱ्यांनी ऊसतोड देऊ नये असे आवाहनही राजू पोवार यांनी केले.
बैठकीस बाबासाहेब पाटील, सर्जेराव हेगडे, शिवाजी वाडेकर, पिंटू लाड, बबन जामदार, सुनील पाटील, एकनाथ सादळकर, कलगोंडा कोटगे, सागर पाटील, सचिन कांबळे, चिनू कुळवमोडे, मयूर पोवार यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
—
Belgaum Varta Belgaum Varta