
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील शहरा बाहेर असलेल्या लेटेक्स कॉलनीमध्ये बऱ्याच वर्षापासून अनेक सुशिक्षित कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडून दरवर्षी नगरपालिकेचे सर्व कर वेळेत भरले जातात. तरीही तेथील नागरिकांना रस्ते, गटारी, पथदीप व पाण्याची सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक कुटुंबांची गैरसोय होत आहे. नगरपालिका प्रशासनाने तात्काळ मूलभूत सुविधा उपलब्ध न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. त्याबाबतची निवेदन नागरिकांनी नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांना दिले आहे.
लेटेक्स कॉलनी ही मुख्य बाजारपेठेपासून लांब अंतरावर आहे. या कॉलनीजवळ बिरोबा मंदिर येथील गटारी असून त्या स्वच्छ केल्या जात नाहीत. त्यामुळे सांडपाणी तुंबून दुर्गंधी पसरत आहे.बंद असलेले पथदीप बसवण्याची वारंवार मागणी करूनही त्याकडे नगरपालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे.
या कॉलनीमध्ये बऱ्याच वर्षापूर्वी रस्ते निर्माण करण्यात आले आहेत. पण त्याची डागडुजी न केल्याने रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. व्यायामशाळेकडून लेटेक्स कॉलनीकडे जाणारा मुख्य रस्ता खराब झाला असून डांबरीकरण करून नागरिकासह वाहनधारकांची सोय करावी. निवेदनाची दखल घेऊन या कॉलनीमध्ये त्वरित मूलभूत सोयी सुविधा द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. मूलभूत सुविधा वेळेत न मिळाल्यास नगरपालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. पालिकाआयुक्त गणपती पाटील यांनी आरोग्य खात्याचे निरीक्षक विनायक जाधव यांना बोलावून कॉलनीमध्ये स्वच्छता करण्याचे आदेश दिले.
निवेदन प्रसंगी सुधीर जोशी, विमल यादव, ललिता खोत, अंजना बंडगर, सुजाता चौगुले, शोभा चौगुले, नंदा रजपूत, सुप्रिया इटेकरी, शोभा श्रीखंडे, एस. बी. गंगाधर यांच्यासह नागरिक आणि महिला उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta