बनावट मोबाईल विक्री करुन फसविले, कारवाईची मागणी
कोगनोळी : पती-पत्नी आणि गुंगीचे औषध दिलेले लहान मूल घेऊन आणि सावज हेरुन बनावट मोबाईल विकले जात आहेत. आतापर्यंत हदनाळ, म्हाकवे आणि परिसरात सहा जणांना गंडा घातला आहे. यामध्ये दोन पत्रकारांचाही समावेश आहे. बदनामीसाठी कोणीही पुढे आलेले नाही हे विशेष. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.
याबाबतची माहिती अशी की, हदनाळ-म्हाकवेसह परिसरात पती-पत्नी आपली लहान मुलगीसह गावोगावी फिरताना दिसतात. पत्नीच्या खांद्यावर गुंगीचे औषध दिलेले लहान मूल आहे. ते आजारी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पैशाची गरज आहे. आम्हाला भीक नको आहे, पण आमचा मोबाईल विकत घ्या आणि बाळाच्या उपचारासाठी पैसे द्या अशी विनवणी या जोडप्याकडून केली जाते. खात्रीसाठी आपले आधारकार्ड व मोबाईल खरेदी केलेली बनावट पावती दाखविली जाते. हे दाखवून समोरच्या व्यक्तीला त्याच्या एका बाजूचा पत्ता नसलेला फोटो काढून घ्यायला लावले जाते. मोबाईल महिन्यापूर्वीच घेतला आहे. बेळगाव येथील दुकानातील मोठ्या रकमेची पावतीही दाखविली जाते. मोबाईल घेणार्यांनी अजूनही काही जास्त शंका व्यक्त केल्यास त्याला मोबाईल नंबर देऊन बोलती बंद केली जाते. सुमारे 25 हजार रुपयांचा मोबाईल अवघ्या 5 ते 7 हजार रुपयाला मिळतो म्हटल्यावर समोरचा माणूस सहज तयार होतो आणि मोबाईल खरेदी करतो. याच पद्धतीने सावज शोधून हे कुटुंब दुसर्या गावच्या सावजाच्या शोधात निघून जातात. केवळ त्या मुलीकडे बघून सहानुभूती दाखवायला जातात आणि माणूस येथेच फसला जात आहे. यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.