
४५ वर्षे स्मारक उपेक्षितच; १२ शेतकऱ्यांनी दिले बलिदान
तंबाखू आंदोलन दिनविशेष

निपाणी (वार्ता) : निपाणी येथे तंबाखू दरासाठी १४ मार्च ते ६ एप्रिल १९८१ अखेर ऐतिहासिक आंदोलन झाले. त्याला ४५ वर्षे पूर्ण होत आहेत. या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १२ शेतकऱ्यांनी बलिदान दिले आहे. गेल्या तीन वर्षापासून प्रथमच तंबाखूला १८० रुपयांवर प्रतिकिलो उच्चांकी दर मिळत आहे. अलीकडच्या काळात तंबाखूला चांगला दर मिळत असल्याने त्यांच्या बलिदानाचे सार्थक होत आहे. ऐतिहासिक तंबाखू आंदोलनात १२ शेतकऱ्यांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या आठवणीसाठी आंदोलननगरात छोटे स्मारक केले आहे. त्या ठिकाणी प्रशस्त असे स्मारक उभे करण्याच्या दृष्टीने दरवर्षी चर्चा केली जाते. त्यानंतर मात्र कोणतीच हालचाल होत नसल्याने शेतकऱ्यांचे हुतात्मा स्मारक उपेक्षितच राहिले आहे.
तंबाखू दराच्या आंदोलनावेळी तत्कालीन मुख्यमंत्री आर. गुंडूराव शास्स्नाने पोलिसी बळाचा वापर करून आंदोलनास बसलेल्या सुमारे ५० हजार शेतकऱ्यांवर ६ एप्रिलला बेछूट गोळीबार व लाठीमार केला. त्यात १२ शेतकऱ्यांचा बळी गेला. त्यात ज्ञानू सुबराव सूर्यवंशी रामपूर, आबासाहेब आप्पासाहेब इंगळे चिखलव्हाळ, भाऊ लक्ष्मण कोडेकर व गोविंद लक्ष्मण कोडेकर-गळतगा, ज्योती देवू गावडे-भोज, महादेव भीमा तावडे-अक्कोळ, अनंत रामा कुराडे-लिंगनूर, शंकर रामा रेंदाळे एकरांबा, थळू भिवा कांबळे-जत्राट, ज्ञानदेव मल्लू पाटील व कृष्णा दादू पाटील- नांगनूर, दिनकर दाजी चव्हाण-ममदापूर यांचा समावेश आहे. त्यामध्ये काहीना आपला हात, पाय व अन्य अवयव गमवावे लागले.
शेतकरी संघटनेची व्यापाऱ्यांशी १३ मार्च रोजी वाटाघाट निष्फळ ठरल्याने १४ मार्च १९८१ पासून शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली तंबाखूला उत्पादन खर्चाशी निगडीत भाव मिळण्यासाठी व्यापक आंदोलन छेडले होते. त्यावेळी यमगणर्णीपासून निपाणीतील कोल्हापूर वेशीपर्यंत हजारो शेतकरी महामार्गावर २४ दिवस ठाण मांडून बसले होते.
कर्नाटक शासनाने ३१ मार्चला आंदोलन चिरडण्याचा निर्णय घेतला. शेतकरी संघटनेने ४ एप्रिलला निपाणी बंदचा आदेश देऊन सुमारे ५० हजार शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा शहराच्या प्रमुख मार्गावरून काढला, पोलिसांनी ६ एप्रिलला पहाटे बेछूट गोळीबार व लाठीमार करून आंदोलन उठवले.
—————————————————————-
लोकसभेत पडसाद
शरद जोशी, प्रा. सुभाष जोशी, गोपीनाथ धारिया यांच्यासह संघटनेच्या नेते व कार्यकत्यांना अटक झाली. या गोळीबाराचे वृत्त वृत्तपत्रांसह बीबीसीसह आकाशवाणीवर तात्काळ देण्यात आले होते. लोकसभेत ७ एप्रिल १९८१ रहा विरोधकांनी सभात्याग करून गोळीबार प्रकरणी चर्चेची मागणी केली होती.
——————————————————————-
तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी
शासनाने तंबाखूजन्य पदार्थ व त्यांच्या जाहिरातीवर बंदी घातल्याने व्यापाऱ्यांनी तेजी-मंदी दाखवून शेतकऱ्यांच्या चांगल्या दर्जाच्या तंबाखूला कमी दर देण्याचा सपाटा अनेक वर्षापासून लावला. त्यामुळे शेतकरी आर्थिक चक्रव्युहात सापडले होते. तीन वर्षापासून मिळत असलेला दर पुढे कायम राहिल्यास शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणार आहे.
——————————————————————
शेतकरी संघटना नावापुरती
आंदोलनानंतर शेतकरी संघटनाही नावापुरतीच शिल्लक राहिली आहे. आतातर दरवर्षी ६ एप्रिलला हुतात्मा स्मारकाजवळ जमून पुष्पहार घालण्याचा कार्यक्रम तेवढाच काही नेते मंडळी, शेतकरी करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta