
गटारीकडेला कचऱ्याचे ढीग; दुर्गंधी, डांसामुळे नागरिक त्रस्त
निपाणी (वार्ता) : नगरपालिकेकडून शहरातील गटारी नाल्यांची साफसफाई सुरू असल्याचा दावा केला जात आहे. तरी गटारी आणि नाल्यातून काढलेला कचरा, घाण काठावरच पडून असल्याच्याही तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे तीन दिवसापूर्वी पडलेल्या पावसामुळे गटारी तुंबून रस्त्यावर सांडपाणी आले आहे. या दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईची मागणी एक-दोन महिन्यांपूर्वीच सुरू होते. पण यंदा त्याबाबत कोणतीच कारवाई नाही. याबाबत तक्रारीही सुरू असून मागील वर्षी शहरासह ओढ्यांच्या कडेला व सखल भागात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत नगरपालिका प्रशासनावर ठपका ठेवल्या गेल्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासन अजूनही दुर्लक्ष करीत आहे.
लहान गटारी व नाल्यातून काढलेला कचरा, घाण, टाकाऊ साहित्य, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या गटारी वगटारीच्या काठावरच पडल्या असल्याच्याही तक्रारी आहेत. बागवान ओढा, काटकर मळा, स्मशान मारुती मंदिर परिसरातील ओढ्यासह अनेक ठिकाणी गटारी व नाल्यांची अद्याप सफाई झालेली नाही. त्याकडे नगरपालिकेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
——————————————————————–
कचऱ्यामुळे दुर्गंधी
शहरातील बेळगाव नाका परिसर, लेंडी नाला, मच्छी, मटन मार्केट, अक्कोळ क्रॉस वरील महात्मा ज्योतिबा फुले फळभाजी मार्केट गाळ्यांच्या परिसरात कचरा साठून दुर्गंधी पसरत आहे. मोठा पाऊस पडण्यापूर्वी कचऱ्याचे ढीग उचलला गेला नाही, तर तो रस्त्यावर पसरून पुन्हा गटारी व नाल्यात गेल्याशिवाय राहणार नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta