
निपाणी शहरातील परीस्थिती; स्वच्छ भारत अभियान कशी यशस्वी होणार?

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नगरपालिका स्वच्छ भारत अभियानात सहभागी झाले असून स्वच्छतेबाबत प्रबोधन करणारे फलक नगरपालिकेच्या संरक्षक भिंती शहर सार्वजनिक ठिकाणी लिहिले जात आहेत. तर दुसरीकडे शहरातील सर्वच रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साटत असल्याने अभियानाबाबत विरोधाभास दिसून येत आहे. त्यामुळे जनजागृतीसाठी केलेला खर्च वाया जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून वळीव पाऊस पडताच नागरिकांना तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. विविध भागांत जागोजागी कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत. पट्टणकुडी देखील कचरा डेपो परिसरात परिस्थिती बिकट झाली आहे. येथे उभे राहणेही कठीण होईल इतकी दुधी पसरलेली आहे. नगरपालिकेकडून कचरा उचलला जात असला, तरी त्यात सातत्य नसल्याने समस्या गंभीर बनत आहे. शहरातून दररोज सुमारे २ ते ३ मेट्रिक टन कचरा संकलित होतो. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पट्टणकुडी हद्दीमध्ये घनकचरा प्रकल्प उभारण्यात आला असला तरी प्रत्यक्षात काम संथगतीने सुरू आहे. काही महिन्यांपासून योग्य प्रक्रिया न झाल्याने डेपोमध्ये कचरा साचून राहिला आहे. उन्हाळात वाढत्या तापमानामुळे कचऱ्याचे विघटन वेगाने होत असून दुर्गधी अधिक वाढतआहे. असे असताना स्वच्छ भारत अभियानाचे फलक लिहिणे कितपत योग्य आहे असा सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे.
——————————————————————
‘स्वच्छ भारत अभियानामध्ये निपाणी नगरपालिका सहभागी झाली आहे. स्वच्छतेबाबत प्रत्येक प्रभागात जनजागृती केली जात आहे. शिवाय फलक ही लिहिले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी कचरा रस्त्यावर न टाकता घंटागाडीला देऊन सहकार्य करावे.’
-गणपती पाटील, नगरपालिका आयुक्त, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta