Monday , May 25 2026
Breaking News

हिदायत नगरातील पाणी समस्या न सोडविल्यास नगरपालिके समोर घागर मोर्चा काढण्याचा इशारा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील बागवान गल्लीजवळील हिदायत नगर परिसरात सध्या भीषण पाणीटंचाईसह रस्ते व गटारांच्या समस्या उद्भवलेल्या आहेत. याबाबत नगरपालिकेकडे बऱ्याचदा समस्या सोडवण्याची मागणी केली असूनही या गंभीर परिस्थितीकडे नगरपालिकेने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. येथील पाण्यासह गटारींची समस्या न सोडवल्यास नगरपालिकेसमोर घागर मोर्चा काढण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.
येथील नगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा केला जाईल या आश्वासनावर नागरिकांकडून डिपॉझिट स्वरूपात १० ते १५ हजार रुपये घेतले गेले. मात्र, गेल्या १५ ते २० दिवसांपासून या भागात पिण्याचे पाणीच आलेले नाही. परिणामी, नागरिकांना स्वतःच्या खर्चातून पाण्याचे टँकर मागवून तहान भागवावी लागत आहे. या भागात प्रामुख्याने सर्वसामान्य कुटुंबे राहत असल्याने टँकरद्वारे पाणी खरेदी करणे त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. वारंवार नगरपालिका कार्यालयात भेटी देऊन तसेच लेखी तक्रारी करूनही प्रशासन या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक महिला व नागरिकांनी केला आहे.
याशिवाय परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था असून त्यावरून चालनेही कठीण झाले आहे. रात्रीच्या वेळी महिला व वृद्ध नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. गटार व्यवस्थाही निकृष्ट असल्याने नागरिकांचे हाल वाढले आहेत. अनेक ठिकाणी गटारी तुंबल्याने दुर्गंधीसह डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आठवडाभरात पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास नगरपालिकेच्या विरोधात घागरी मोर्चा काढण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.या सर्व पार्श्वभूमीवर, हिदायत नगर परिसरातील गंभीर समस्यांकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

आप्पाचीवाडी पुलासाठी आरपारची लढाई; रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार

Spread the love  २८ रोजी पाटबंधारेसह तालुका पंचायत कार्यालयाला टाळे ठोकणार निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *