सौदलगा : सौंदलगा येथे ऐतिहासिक बुरुजाचे संवर्धन करण्यासाठी युवक वर्गाकडून प्राधान्य, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कामास सुरुवात. गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती. सौंदलगा येथे भुईकोट किल्ला होता त्या किल्ल्याची पडझड झाली असून इतिहासाचा शेवटचा दुवा म्हणून एक बुरूज उभा आहे.त्या बुरुजाचे संवर्धन करणे व इतिहासाचा अमोल ठेवा जतन करणे सौंदलग्यातील युवावर्गाने ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बुरूज संवर्धनाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौंदलग्यातील ज्येष्ठ नागरिक पांडुरंग सुरवसे यांनी बुरुजाचे पूजन केले व त्याचबरोबर महादेव शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर पीकेपीएसचे चेअरमन संजय शिंत्रे यांनी सांगितले की, या वास्तूचे पुनर्वसन करण्यासाठी संस्थेतर्फे आम्ही पूर्णपणे सहकार्य करू.
माजी एपीएमसी सदस्य शशिकांत पाटील म्हणाले की, या बुरुजाचे लोक सहभागातून याचे काम लवकरात लवकर पूर्ण करू या बरोबरच आनंदा सुरवसे, सु. मा. कुलकर्णी यांनीही मनोगते व्यक्त केली. यावेळी बुरुजाचे बचाव समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते, पीकेपीएसचे संचालक यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार बाळासाहेब चव्हाण यांनी मानले.
