पाच जण ताब्यात : स्मशानात शिजला खुनाचा कट
निपाणी (वार्ता) : जुन्या वादातून अभिषेक दत्तवाडे या युवकाचा खून झाल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. या प्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यामध्ये तीन आरोपी अल्पवयीन आहेत. सैफअली नगारजी (रा.जत्राट) आणि अमन एकसंबे (निपाणी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या खुनाचा कट संबंधित आरोपींनी येथील स्मशानभूमीमध्ये रचला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वरील सर्व आरोपी आणि अभिषेक दत्तवाडे यांचे एक महिन्यापूर्वी येथील प्रभात चित्र मंदिर जवळ किरकोळ कारणावरून भांडण झाले होते त्यावेळी अभिषेकने वरील पैकी काही जणांना मारहाण केली होती. तेव्हापासून सर्व जण अभिषेकचा काटा काढण्याचे ठरविले होते. त्यानुसार तेथील स्मशानभूमीमध्ये सर्वजण एकत्र येऊन अभिषेकवर कोणत्या पद्धतीने हल्ला करायचा याबाबत चर्चा केली त्यानंतर सैफ अली याने घरातील चाकु, रॉड व इतर वस्तूंचा पुरवठा केला.
रविवारी (ता.३) सर्व आरोपींनी अभिषेक किती वाजता घरी येतो त्याची माहिती घेतली. त्यानुसार रात्री १२ नंतर अभिषेक राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये खालील मजल्यावर दोघे वरील मजल्यावर तिघे थांबून होते. अभिषेक चित्रपटगृहातील काम संपून रात्री एक वाजता पवन बाजीराव मगर या मित्राच्या दुचाकीवरून घरासमोर आला. अभिषेक जिन्यावरून वर चढत असतानाच दबा धरून बसलेल्या दोघांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर वर थांबलेल्या तिघांनीही चाकूने सपासप वार केले. त्याचवेळी पवन मगर व अभिषेकची आई घटनास्थळी पोचताच सर्वांनी पोबारा केला. वर्मी घाव बसल्याने अभिषेकचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर सर्वच आरोपी पुन्हा स्मशानात येऊन भीम नगर मार्गे राष्ट्रीय महामार्गावरील महात्मा गांधी हॉस्पिटल थांबून ट्रकमधून काकड काकतीकडे पलायन केले. काकती येथे रात्रभर एका शेतात जागून काढून पुरावा नष्ट करण्यासाठी ईदगाह जवळ जाऊन रक्ताने माखलेले कपडे जाळून टाकले. दरम्यान या परिसरात आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निम्बर्गी, चिक्कोडीचे पोलीस उपाधीक्षक बसवराज एलीगार, निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कृष्णवेणी गर्लहोसुर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. बी. कोतवाल व सहकाऱ्यांनी सापळा रचून सर्व आरोपींना जेरबंद केले. त्यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
—-
स्मशानातून खुनाचा कट
किरकोळ भांडणाचे पर्यवसान होऊन खुनामध्ये झाले होते. त्यामुळे संबंधित आरोपींनी स्मशानभूमीत खुनाचा कट रचला होता. त्यानंतर काम फत्ते झाल्यावर या स्मशानातच बैठक घेऊन सर्व आरोपी काकतीकडे रवाना झाले होते.
