
पावसाचे पाणी जाणार कुठे : नगरपालिकेने गांभीर्याने लक्ष द्यावे
निपाणी (संजय सूर्यवंशी) : निपाणी शहर परिसरातील ओढे- नाले प्लॉस्टीक, निर्माल्य, जुने कपडे, जुन्या इमारतीची दगड माती अशा टाकावु साहित्याने भरलेली आहेत. पावसाळ्यात पाणी वाहण्यासाठी जागाच नाही. अशावेळी अतिवृष्टीने महापुर आला तर शेती बरोबरच परिसरातील रहिवाशांचेही नुकसान होणार आहे. त्याकडे नगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी माजी सभापती प्रा. राजन चिकोडे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
येथील चिक्कोडी रोडवरील विरुपाक्ष लिंग समाधी मठ जवळील ओढा, चिकोडी रोड रामपुर ओढा, बागवान ओढ्यात टाकावू वस्तू टाकल्यामुळे ओढा की गटार असा प्रश्न पडला आहे. ही स्वच्छता पावसाळ्यापूर्वी करावी, अशी मागणी या परिसरातील शेतकरी व नागरीक करीत आहेत. ओढा मुजला तरी चालेल पण माझी जमीनीची हद्द वाढत जावू दे ही भावना मनात ठेवून काहीनी रस्ता रुंदीकरणाचे कामाच्या वेळी ओढ्यात मुरूम टाकून ओढा आपल्या हद्दीत घेतल्याचे दिसते. २५ ते ३० फुट रुंदीचा असणारा ओढा गटारसारखा दिसत आहे. चिक्कोडी रोडच्या बाजुचे ओढे दिसतच नाहीत. पुर्वी प्रसार माध्यमांनी याबाबत बातमीद्वारे शासनाने लक्ष वेधेले होते. त्याची माहिती जिल्हा, तालुका पातळीवर पाठवूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. बागवान गल्लीतील ओढा व समाधी मठ सुतार ओढा म्हणजे कचरा कुंडीच झाली आहे. घरातील अडगळीतील सामान, मयत व्यक्तींचे कपडे, अंथरूण पांघरून, दगड, तुटकी चप्पला असे अनावश्यक साहित्य नागरिक बिनधास्त टाकत आहेत. या परिसरात मठ, मंदिरे आहेत. यंदा लवकरच पावसाळा सुरू होईल. यावर्षी अधिक पाऊस होण्याचा अंदाज वेध शाळेचा आहे. दुर्दैवाने महापुरासारखी परिस्थिती आली तर या परिसरातील पिकांचे, शेतीचे व परिसरातील नागरिकांचे नुकसान होणार आहे. त्यापेक्षा ओढे, नाले स्वच्छ करून पावसाच्या पाण्याला वाट करून द्यावी. पर्यावरणाचे समतोल राखून नैसर्गिक आपत्तीला तोंड देणे आवश्यक आहे. नुकसान भरपाई देणे, घेण्यापेक्षा ओढे, नाले पावसाळ्यापूर्वी कसे स्वच्छ होतील याकडे पहावे. यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून संबंधीत विभागाला त्वरित आदेश देण्याची मागणी चिकोडे यांनी केली आहे.—-