
बेनाडीतील मधाळे कुटुंबियांचा उपक्रम : गिजवणे शाळेला साहित्य
निपाणी (वार्ता): बेनाडी येथील रहिवासी व सध्या बेळगाव येथील के.एल.ई. हॉस्पिटलमध्ये सेवा बजावत असलेले राजू आण्णाप्पा मधाळे व त्यांच्या पत्नी सुनंदा मधाळे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तसेच अथर्व शिवलिंग स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील साई एज्युकेशन सोसायटी संचलित मूकबधिर निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून अनोखा उपक्रम राबविला.
गिजवणे येथील मूकबधिर असलेल्या संस्थेतील इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या 45 विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल, पाटी व स्वादिष्ट भोजन देऊन मधाळे परिवाराने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
यावेळी बोलताना राजू मधाळे म्हणाले, बरेच लोक आपल्या लग्नाचा वाढदिवस व स्वत:च्या मुलांचा वाढदिवस मोठमोठ्या रिसॉर्टमध्ये भरगच्च कार्यक्रम करून आनंदाने साजरा करीत असतात. पण आम्ही या मूकबधिर शाळेतील मुलांसोबत आमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करीत आहोत. गडहिंग्लज येथील शिवलिंग स्वामी यांचे चिरंजीव अथर्व यांचा नववा वाढदिवस दोन्ही कुटुंबातर्फे साजरा केला. त्यामुळे आम्हाला आनंद होत आहे. इथून पुढेही देण्याचा आमचा विचार असल्याचे सांगितले.
प्रारंभी या निवासी शाळेच्या शिक्षिका रूपाली बोरगावे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात मधाळे कुटुंबियाकडून यापूर्वी दोन वेळा आणि आता ही मदतीचा हात निवासी शाळेसाठी देऊन योगदान दिल्याचे सांगितले.
कार्यक्रमास राजू मधाळे, सुनंदा मधाळे, अथर्व स्वामी, शिवलिंग स्वामी, अश्विनी स्वामी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta