
स्वच्छतागृहांना अस्वच्छतेचा वेढा : नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
निपाणी (वार्ता) : शहरात पालिकेकडून गरजेच्या ठिकाणी महिला व पुरुषांकरिता स्वच्छतागृहे उभारली आहेत. मात्र अनेक ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने व साफसफाई अभावी दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे साखरवाडी येथील शौचालया समोर तीन-चार दिवस साठवणार्या कचर्यामुळे गोड साखरवाडीत दुर्गंधीचा वारा सुटत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही ठिकाणी स्वच्छतागृहे बंद पडली आहेत. याशिवाय भिमनगर परिसरातील स्वच्छतागृहे समस्यांच्या विळख्यात सापडल्याने बंद आहेत. याकडे नगरपालिकांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
स्वच्छतागृहे बांधण्यासाठी नगरपालिकेने मोठ्या प्रमाणात खर्च व रंगरंगोटी केली आहे. बाहेरून पाहिल्यावर प्रशस्त आणि सर्व सोयींनीयुक्त स्वच्छतागृह वाटते. तेथे नागरिकांना घाण व दर्गंधी पाहून मनस्ताप सहन करावा लागतो.
साखरवाडी परिसरातील नागरिकांसाठी एकमेव सार्वजनिक शौचालय आहे पण ते जुन्या काळातील असून वारंवार ते नादुरुस्त होते. त्यामुळे रस्त्याच्या कडेला मैला जात असल्याने दुर्गंधी पसरत आहे. त्याशिवाय वेळेवर कचरा गाडी येत असल्याने परिसरातील नागरिक शौचालया समोरच कचरा टाकत असल्याने ढीग साठत आहेत. त्यामध्ये डुकरांचा वावर असल्याने रस्त्यावर कचरा विखुरला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी ही घंटागाडीला कचरा देणे आवश्यक आहे.

ग्रामीण भागातील अनेक नागरिक दररोज कामानिमित्त निपाणी शहरात येतात. बर्याचदा ते स्वच्छतागृहांचा उपयोग करतात. नेहमी स्वच्छतेचे धडे गिरवणार्या नगरपालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सुंदर निपाणी स्वच्छ निपाणी हे ब्रीदवाक्य फक्त कागदावरच दिसून येत आहे. यासाठी नगरपालिकेने लक्ष देऊन टँकरच्या पाण्याने स्वच्छता करावी. बंद स्वच्छतागृहे तत्काळ सुरू करण्याची मागणी होत आहे.
—-
’शहरात अनेक स्वच्छतागृहे बंद असल्याचा सर्वाधिक त्रास महिलांना होत आहे. याशिवाय साखरवाडीमधील शौचालय परिसर दुर्गंधीयुक्त बनला आहे. त्याच्या स्वच्छतेसाठी बर्याचदा नगरपालिकेला कळवूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. याशिवाय नगरपालिकेच्या विरोधी गटातील नगरसेवकांची कामे होत नसल्याचा आरोपही केला जात आहे.
-संदीप खडके, निपाणी.
Belgaum Varta Belgaum Varta