3 महिन्यात होणार काम पूर्ण
निपाणी : येथील गांधी चौकात बर्याच वर्षापासून महात्मा गांधी पुतळाची प्रतीक्षा होती. अनेक वेळा मागणी करूनही तांत्रिक अडचणीमुळे मागणी पूर्ण झाली नव्हती. अखेर उशिरा का होईना निपाणी नगरपालिकेच्या वतीने शहरातील गांधी चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचा पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शहरवासी यातून समाधान व्यक्त होत आहे.
गांधी चौकात महात्मा गांधी यांचा पुतळा बसण्यासाठी काही वर्षांपूर्वी चबुतरा तयार करण्यात आला आहे. पण पुतळ्याची प्रतीक्षाच होती. अखेर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा ठराव करण्यात आला आहे. शिल्पकार संजय संकपाळ यांनी गांधी चौकातील चबुतर्याची दोन दिवसापूर्वी पाहणी केली. यावेळी नगराध्यक्ष जयवंत भाटले, नगरसेवक राजू गुंदेशा, राजेश कोठडिया, अभिनंदन मुदकुडे यांची उपस्थिती होती. पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी सुमारे सात ते आठ लाखांचा तर अर्धपुतळा उभा करण्यासाठी दोन ते अडीच लाख रुपये खर्च येणार आहे. शिवाय चबुतरा सुशोभीकरण करावे लागणार आहे. राज्य सरकारने गेल्या तीन वर्षांपासून पुतळा उभारण्याच्या खर्चास मान्यता दिलेली नाही. नवे अनुदानही पालिकेला मिळालेले नाही. त्यामुळे पूर्णाकृती की अर्धपुतळा करायचा, याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. शिल्पकार संजय संकपाळ यांनी पाहणी केल्याने पुतळा उभारणीच्या कामाला थोडी गती मिळाली आहे. ऑर्डर दिल्यानंतर तीन चार महिन्यांत पुतळ्याचे काम पूर्ण होणार असल्याचे संकपाळ यांनी सांगितले.
Check Also
श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब …