निपाणी : देशसेवा बजावलेल्या हादनाळचे माजी सैनिक सदाशिव शेटके यांना निपाणीचे प्रशासन आणि खासदार, आमदार मंत्री महोदय यांच्याकडून न्यायच मिळेना. या अन्यायाच्या विरोधात त्यांनी बुधवार 25 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता निपाणी तहसीलदार ऑफिससमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा निर्णय घेतला.
माजी सैनिक सदाशिव शेटके हे स्वत:च्या स्वार्थासाठी उपोषण करत नसून मागील महापुराच्या वेळी हादनाळ गावातील पडझड झालेल्या घरांची योग्य ती चौकशी करून गोरगरिबांना घरकुल मिळावे या मागणीसाठी त्यांनी हा लढा चालवला आहे. नैतिकता न ठेवलेल्या प्रशासनाने देशसेवा बजावलेल्या माजी सैनिकाचा छळ करीत आहे. 1 महिन्यापूर्वी आप्पाचीवाडी ग्रामपंचायत समोर उपोषणाला बसल्यानंतर निपाणीच्या प्रशासनाने पंधरा दिवसात आपल्या प्रश्नाची सोडवणूक करू असे ठोस आश्वासन दिले होते. दिलेल्या आश्वासनाचा आता कालावधी संपला असून निर्ढावलेल्या प्रशासन, आमदार, खासदार, मंत्री यांचा दबाव यामुळे या लढ्याला न्याय मिळत नसून आता मात्र आमची आरपारची लढाई आहे.
25 तारीख रोजी कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या माध्यमातून आणि चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजूदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण निपाणी तहसीलदार ऑफिस समोर आमरण उपोषण करणार असून न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असे ठामपणाने सदाशिव शेटके यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta