सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल सौंदलगा शाखेमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास विषयक मार्गदर्शन करताना शाखेच्या माजी विद्यार्थिनी सौ. रुपाली निलाखे (कासार) यांनी प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना विद्यार्थ्यानी आहार कसा घ्यावा, योगा करावा, चांगल्या सवयी जोपासावेत व आपले आपल्या आई-वडिलांचे शाळेचे नाव उज्ज्वल करावे असे मत व्यक्त केले.
सौंदलगा शाखेमध्ये रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई पाटील यांच्या जन्मदिनी अभ्यास विषयक मार्गदर्शनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी सौ. रुपाली निलाखे व त्यांचे पती प्राध्यापक डॉ. श्रेयांश निलाखे मेडिकल कॉलेज सुरत यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन दिले.
या कार्यक्रमात सर्वप्रथम लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. श्री. एस. व्ही. यादव यांनी उपस्थितांचे स्वागत ओळख व प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जे. एस. वाडकर होते. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक वाडकर यांनी माजी विद्यार्थिनी कासार यांची प्रशंसा केली आणि असेच विद्यालयाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी श्री. कांती नाथ कासार, चेतन कासार, अॅड. वृषाली देसाई यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. व्ही. यादव यांनी केले तर आभार एस. डी. कुंभार यांनी मानले.
