दौलतराव पाटील फाउंडेशनच्या महिलांचा उपक्रम : परंपरा व पर्यावरणाची घातली सांगड
निपाणी (विनायक पाटील) : परंपरा व पर्यावरणाची सांगड घालत येथील दौलत नगरातील दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन, हेल्थ क्लब आणि जायंट्स क्लबच्या माध्यमातून वटवृक्षाच्या रोपांची निर्मिती करून महिलांनी वटसावित्री सण साजरा केला. शिवाय वृक्षारोपण करून रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करण्याचा संकल्प केला.
दौलत नगरमधील सामाजिक कार्यकर्त्या सुधाराणी पाटील, स्नेहल निकम आणि वसुंधरा पाटील यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
वडाला अक्षय वृक्ष म्हणून संबोधले जाते. वृक्षाचा क्षय होत नाही तर ते सतत वाढत जातो. वडाच्या पारंब्या जमिनीतून पुन्हा पुन्हा रूजल्याने झाडाचा विस्तार होतो. विशाल आकार व भरपूर पाने असल्याने तो अनेक विषारी वायू शोषून घेतो. हवा शुद्ध ठेवतो. हा महाकाय वटवृक्ष थंड सर्वाधिक प्राणवायू देणारा असून त्याची साल व मूळ अतिशय गुणकारी समजली जाते. त्यामुळे परंपरा व पर्यावरण यांची सांगड घालून वटवृक्ष रोपण व त्याचे संवर्धनाचे दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनच्या महिला समितीने हाती घेतले आहे. गत 3 वर्षापासून दौलत नगर परिसरात विविध जातींच्या वृक्षाचे रोपण व शेकडो रोपांचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय त्याचे संवर्धनाचे कार्य फाउंडेशन कडून होत आहे. परंपरा आणि पर्यावरण यांची सुंदर गुंफन वटसावित्रीच्या सणाच्या माध्यमातून घडवून आणले आहे. सर्वानी आपआपल्या परिसरात जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षारोपण उपक्रमात करून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन सुधाराणी पाटील, स्नेहल निकम यांनी केले.
यावेळी मंगल पाटील, मंगल भोस्की, रूपाली कनेरकर, वैशाली पाटी, स्वाती भोस्की, फाउंडेशनचे संस्थापक निकु पाटील, अध्यक्ष रमेश भोईटे, उपाध्यक्ष सुनील घाडगे, सेक्रेटरी महादेव बन्ने, खजिनदार नारायण यादव, मनोहर जाधव, वसंत धारव, मनोहर कापसे, सागर लोंढे, सागर पाटील, स्वप्नील पावले, रणजीत मगदूम, शैलेश मल्लाडे, सुभाष शिंदे, महादेव मल्लाडे, सुनील मल्लाडे, चंद्रकांत पोवार, विक्रम पोवार, बबन निर्मले यांच्यासह फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.
