निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील के. एल. ई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पीटल आणि निपाणीतील रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने आयोजित थायरॉईड स्क्रीनिंग आणि ब्लड शुगर व एंडोक्राइनोलॉजी या आजारावर आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर रोटरी हॉलमध्ये पार पडले. त्याला रूग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये 110 रूग्णांनी सहभाग नोंदवित आरोग्य तपासणी करवून घेतली.
सकाळी 10 वाजता बेळगाव के. एल. ई. संस्थेचे संचालक अमर बागेवाडी, रोटरी क्लबचे अध्यक्ष सोमनाथ परमणे व मान्यवरांच्या उपस्थितीत या आरोग्य तपासणीस सुरूवात करण्यात आली. यावेळी एंडोक्राइनोलॉजी तज्ञ डॉ. विक्रांत घटनाट्टी यांनी थायरॉईड स्क्रीनिंग आणि ब्लड शुगर व एंडोक्राइनोलॉजी आजारांबाबत मार्गदर्शन केले. या शिबीरात 60 रूग्णांची थायरॉईड तपासणी, 50 रूग्णांची मधुमेह तपासणी करून त्यांना सल्ला देवून मोफत औषधेही वितरीत करण्यात आली. अमर बागेवाडी यांनी, केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पीटलच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वत्र गरजू रूग्णांना मोफत आरोग्य तपासणी व उपचाराकरिता विविध संस्था, संघटनांच्या सहयोगातून उपक्रम राबविण्यात येत आहे. याचा लाभ घ्यावा. निपाणीत रोटरी क्लबच्या सहकार्यातून वेळोवेळी आरोग्य शिबीराचे आयोजन केले जात असून याचा लाभ भागातील असंख्य रूग्णांना होत असल्याचे सांगीतले. यावेळी के.एल.ई रोटरी हेल्थ केअर सेंटरचे अध्यक्ष सचिन देशमाने, केएलई रोटरी हेल्थ केअरचे समन्वयक संजय पाटील, स्वयंसेवक चंद्रकांत बोरगावे, चंद्रकांत पोवार, बापू वारके यांच्यासह रोटरी संचालक, आरोग्य सेवक व रूग्ण उपस्थित होते.
