राजू पोवार : बेळगावमध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : कृषिप्रधान देशात शेतकरी हा मुख्य कणा आहे. तरीही त्याच्यावर केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक प्रकारे अन्याय केला जात आहे. शेतकऱ्यांनी एकजूट करून शासनाच्या विरोधात लढल्याने हा अन्याय दूर झाला आहे. अजूनही वेगवेगळ्या प्रकारे त्याचा छळ सुरू आहे. त्याच्याविरोधात रयत संघटना नेहमीच रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. शेतकरी जगला तरच देश वाचेल. ही गोष्ट लक्षात घेऊन आता जिल्हास्तरावर संपर्क कार्यालय सुरू करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात येणार आहेत, असे मत चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी व्यक्त केले.
बेळगांवचे जिल्ह्याच्या ठिकाणी कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या संपर्क केंद्राचे उद्घाटन करून ते बोलत होते. यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी, राघवेंद्र यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
चुन्नाप्पा पुजारी म्हणाले, दरवर्षी अतिवृष्टी आणि महापुरामध्ये पिकासह, शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबियांच्या घरांचे मोठे नुकसान होत आहे. पण निपक्षपातीपणे सर्वे होत नसल्याने त्यांना नुकसान भरपाई पासून दूर राहावे लागत आहे. याबाबत निवेदन आंदोलने करूनही सरकारचे दुर्लक्ष होत आहे त्यासाठी आता रयत संघटना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. यावेळी राघवेंद्र, रवी सिद्धन्नावर यांनी ही शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न संघटना मजबूत करण्यात येणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास बाळासाहेब हादीकर, राजु परगण्णवर, मल्लीकार्जुन रामदुर्ग, भगवान गायकवाड, उमेश भारमल, सुरेश पाटील, सर्जेराव हेगडे, आनंत पाटील, रमेश पाटील यांच्यासह बेळगांव जिल्ह्यातून शेकडो संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
