Sunday , July 21 2024
Breaking News

निपाणीत जलवाहिन्यांना फुटीचे ग्रहण!

Spread the love
दररोज लाखो लिटर पाणी वाया : शहरात कृत्रिम पाणी टंचाई
निपाणी (वार्ता) : २४ तास पाणी योजनेच्या जलवाहिन्यांना निपाणीत फुटीचे ग्रहण लागले आहे. तर लिकीजेसचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून कंत्राट दिलेले कंत्राटदार त्यांच्या कामकाजावर पाणीपुरवठा विभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागत आहे. त्यामुळे पाणी असूनही मानवी त्रुटींमुळे नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागत आहे.
निपाणीत २४ तास पाणी योजना केवळ नावापुरतीच असली तरी या योजनेतील गळतीमधून गेल्या महिन्याभरापासून अखंड २४ तास हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पावसाने अद्यापपर्यंत दडी दिल्याने निपाणी जवाहरलाल नेहरू जलाशयात पाण्याची पातळी वेगाने खाली जात आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यात  व्यत्यय येत आहे. पाणी नियोजनातील कमतरतेमुळे शहरवासियांना पाच पाच; सहा – सहा दिवस पाण्याची वाट पहात रहावे लागत आहे. तर रात्री – अपरात्री जागून मानसिक, शारिरीक त्रास सहन करीत पाणी भरावे लागत आहे. अशी बिकट परिस्थिती असताना पुन्हा एकदा २४ तास योजनेचे काम पाहणाऱ्यांचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे.
शहराला पाणी पुरवठा करणारी प्रमुख जलवाहिनी असलेल्या जुना पी. बी. रोड येथील लोकमान्य टिळक उद्यानासमोरून जाणाऱ्या भुमिगत जलवाहिनीला रस्त्याच्या मधोमध गळती लागली आहे. सुमारे महिन्याभरापासून या गळतीमधून निरंतर २४ तास पाणी वाहतच आहे. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी या गळतीमधून वाहून जात आहे.।याबाबत संबंधित पाणीपुरवठा विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केले असून या गळतीकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देवून सदर दुरुस्तीचे काम करून घेण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. नगरलपालिकेच्या विभागाचा कारभार पूर्णतः ढेपाळल्याचे चित्र आहे. या विभागाला प्रशासनाचे पाणीपुरवठा तर अभय नाही नाही , अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
नगरपालिकेने शहरात जलवाहिन्या टाकल्या असल्या तरी अद्यापही सर्वच ठिकाणी पाणीपुरवठा मात्र सुरळीत झालेला नाही. टाकलेल्या जलवाहिन्या असो व जुन्या जलवाहिन्या असो फुटण्याचे प्रकार वारंवार घडून येत आहेत. मागील काही वर्षांत तर असे प्रकार वारंवार होत असून, कुठल्याही अधिकारी वर्गाला याचे सोयरसूतक राहिल्याचे दिसून येत नाही.
——————————————————–
कंत्राट देऊनही पालिका कर्मचाऱ्यांवरच मदार नगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठा नियंत्रित करण्यासह देखभाल, दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये देऊन कंत्राट दिले आहे. परंतु या एजन्सीचे अस्तित्व कुठे जाणवतच नाही. अजूनही शहरातील पाणी पुरवठ्यासाठी पालिकेच्याच कर्मचाऱ्यांचा वापर करणे सुरू आहे. लिकीजेस काढले जात नाही, वेळेवर दुरुस्ती नाही. त्यामुळे या एजन्सीचा नेमका लाभ कुणाला हा प्रश्न निर्माण झाला आहे.
—————————————————–
‘अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे शहर आणि उपनगरात वारंवार जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडत आहेत. त्याबाबत संबंधित कंत्राटदारांना सांगितले जात असून त्यांच्याकडून दुरुस्तीचे काम केले जात आहे. यापुढील काळात जलवाहिन्या फुटणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल.’
– जगदीश हुलगेज्जी, नगरपालिका आयुक्त, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

सध्या शिक्षणाला अधिक महत्त्व द्या

Spread the love  क्षमा मेहता; ‘इनरव्हील’तर्फे आनंदी शाळेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : सध्या जग बदलत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *